
‘ऑगस्ट २०२४ मध्ये माझ्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता वाढली होती. त्या वेळी मला गुरुदेवांच्या कृपेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नामजपादी उपायांसाठी जाण्याची संधी मिळाली. तेव्हा मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांचे नामजपादी उपायांविषयी मार्गदर्शन लाभले. त्यांनी मला ‘नामजपादी उपाय कसे करायचे ?’, हे शिकवले आणि तसे उपाय माझ्याकडून करून घेतले; पण त्रास होत असल्यामुळे मला काही अनुभवता येत नव्हते आणि तेथे बसणेही अशक्य वाटत होते.

सद्गुरु गाडगीळकाका मला माझ्या शरिरातील त्रासाचे स्थान ओळखण्याविषयी सांगायचे; परंतु ते माझ्या लक्षात येत नव्हते. तेव्हा ते माझ्यावर नामजपादी उपाय करत होते आणि मलाही उपाय करायला सांगत होते अन् नंतर ‘कसे वाटते ?’, असे विचारत होते. काही क्षण मला बरे वाटायचे आणि मग पुन्हा त्रास व्हायचा. त्रास होत असलेल्या स्थानावर उपाय केल्यावर दाब न्यून झाल्याचे मला जाणवत होते; पण माझा शारीरिक त्रास न्यून होत नव्हता.
नामजपादी उपायांचे ‘वाईट शक्तीचे आवरण काढणे, नामजप करणे, ध्यान लावणे आणि क्षमायाचना करणे’, असे टप्पे आहेत. नामजप करून झाल्यावर सद्गुरु गाडगीळकाकांनी मला ध्यान लावायला सांगितले. तेव्हा मला त्रासामुळे काही क्षणही डोळे मिटता येत नव्हते. मग त्यांनी मला शरणागत भावात राहून ध्यान लावण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले. तसे केल्यावर माझा त्रास थोपवल्यासारखे वाटून मला ध्यान लावता आले. मग त्यांनी पुढचे उपाय शरणागत भावात राहून करायला सांगितले. तसे केल्यावर मला उपाय करता आले आणि काही प्रमाणात अनुभवता आले.
‘मला कोणीतरी सूक्ष्मातून त्रास द्यायचा प्रयत्न करत आहे; पण मी शरणागत असल्यामुळे त्यांना मला त्रास देता आला नाही’, असे मला जाणवले. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाका मला म्हणाले, ‘‘चैतन्य मिळू नये; म्हणून वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत आहेत. तुम्ही शरणागत भावात राहिल्यास त्या त्रास देऊ शकत नाहीत.’’ त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला.
दुसर्या दिवसापासून मी शरणागत भावात राहून नामजपादी उपाय करण्याचा प्रयत्न केला. आरंभी माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष झाला. तेव्हा ‘जणू युद्ध होत आहे’, असे मला वाटले; पण काही वेळाने संघर्ष न्यून होऊन मला उपायांचा परिणाम पुष्कळ पटींनी अनुभवता आला. उपायांच्या प्रत्येक टप्प्याला मला प्रकाशात वाढ होत गेल्याचे आणि शेवटी संपूर्ण शरिरात चैतन्य पसरल्याचे दिसले. रामनाथी आश्रमात असतांना पुढील सर्व दिवस मला असे अनुभवता आले. याआधी मला असे कधीच अनुभवता आले नव्हते. नामजपादी उपाय करायला लागल्यावर मला त्रास होत असे आणि उपाय झाल्यानंतरही मला त्रास जाणवत असे. त्यामुळे माझ्या मनात ‘उपाय करूनही काही फरक पडत नाही’, अशी नकारात्मकता असायची आणि मला ताण यायचा. ‘रामनाथी आश्रमात आल्यावर सद्गुरु काकांनी मला उपायांविषयी मार्गदर्शन केल्यानंतर माझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार नाहीसे होऊन माझ्यात सकारात्मकता निर्माण झाली’, याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. प्रियांका प्रभुदेसाई, ठाणे (ऑगस्ट २०२४)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |