१. लग्नापूर्वी नोकरी करत असतांना वेळ मिळाल्यास नामजप करणे आणि लिहून काढणे आणि लग्नानंतर यामध्ये खंड पडणे

‘मी साधनेमध्ये येण्यापूर्वी लग्नाच्या आधी अर्धवेळ नोकरी करत होते. त्या ठिकाणी मला थोडा जरी वेळ मिळाला की, मी नामजप करत असे आणि १०८ वेळा नामजप लिहून काढत असे. माझे लग्न झाल्यावर यामध्ये खंड पडला.
२. लग्नानंतर साधना आणि सेवा करणे
गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने लग्नानंतर ५ – ६ वर्षांनी माझी साधना चालू झाली. मला सत्संग मिळाल्यावर ‘प्रवचन करणे, सत्संग घेणे आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या घड्या घालणे’, अशा सेवा मिळाल्या. मला पुष्कळ आनंद मिळाला. सत्संगामध्ये काही अडचणी आल्या, तर त्या सोडवण्यासाठी यजमानांनी मला पुष्कळ साहाय्य केले.
३. यजमानांनीही सेवेत सहभाग घेणे
माझे यजमान २ वर्षांपासून साधनेत आहेत. त्यांच्यामध्ये पुष्कळ तळमळ आणि भाव आहे. त्यांना मणक्यांचा सांधेदुखीचा त्रास असूनही ते सकाळी ८ ते १०.३० या वेळेत वाहन चालवतात. गुरुदेवच त्यांना सहनशक्ती देतात. ते छापखान्याशी संबंधित सेवा करतात. माझ्या यजमानांची व्यावहारिक कामे करतांना समष्टी सेवाही होते. ते इतरांना साधनेविषयी सांगतात. ते सात्त्विक उत्पादनांचे वितरण करतात.
४. गुरुदेवांप्रती भाव
यजमानांनी आश्रम पाहिला; पण गुरुदेवांचे दर्शन त्यांना झाले नाही; पण त्यांना त्याविषयी खंत वाटत नाही. ते प्रत्येकामध्ये गुरुदेव पहातात. ‘माझे गुरुदेव चराचरात आहेत’, असा त्यांचा भाव असतो.
५. चारचाकी गाडीचा अपघात होऊनही यजमानांना काही न होणे
एकदा माझ्या यजमानांच्या ‘ॲपे’ या गाडीला अपघात झाला. यजमान गाडी चालवत असतांना दुसरी गाडी समोरून येऊन आमच्या गाडीवर आपटली. त्यामुळे आमची गाडी मार्गावरून एका कडेला गेली आणि गाडीने ३ – ४ कोलांट्या मारल्या; परंतु गुरुदेवांच्या कृपेमुळे माझ्या यजमानांना काही झाले नाही आणि गाडीचीही अधिक हानी झाली नाही. मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. कल्याणी संतोष धनावडे, रत्नागिरी (२४.१०.२०२४)