साधिकेला हृदयात जाणवलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व आणि तिला स्वतःत जाणवलेले पालट !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 १. हृदयात प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे आणि ‘साधनेच्या प्रयत्नांत लवकर वाढ केली पाहिजे’, असे वाटणे 

‘मला हृदयात प.पू. डॉक्टरांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अस्तित्व अखंड जाणवत असते. मी हृदयाला हात लावला, तरी मला त्यांचे अस्तित्व जाणवते. माझ्या हृदयात ध्यानस्थ प.पू. डॉक्टरांचे रूप आणि त्यांचे नेहमी हसतमुख अन् सर्वांशी बोलणारे रूप, अशी २ रूपे असतात. ध्यानस्थ प.पू. डॉक्टरांचे रूप माझ्याशी कधीच बोलत नाही, तर हसतमुख रूप माझ्याशी अखंड बोलत असते.

अयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून मला हृदयात श्रीरामाचे रूप जाणवते. (श्रीरामाचे रूप, म्हणजे प.पू. डॉक्टरांचे रूप) मला हृदयात प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवायला लागल्यापासून ‘मला साधनेचे प्रयत्न लवकरात लवकर वाढवले पाहिजेत’, असे सतत वाटू लागले.

सौ. जान्हवी

२. करत असलेले प्रयत्न

माझ्या मनात पुष्कळ विचार किंवा प्रतिक्रिया आल्या, तर पूर्वी माझा लढण्याचा भाग अल्प होता. त्यात माझा पुष्कळ वेळ वाया जात असे. आता मी स्वतःच्या साधनेविषयी कठोर होऊन मनात विचार आल्यास माझा लगेचच त्यामधून बाहेर पडण्याचा भाग होतो.

माझ्याकडून ‘कठोर प्रायश्चित्त घेणे, स्वतःच्या डोक्याभोवती सूक्ष्मातून ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’ असे लिहिणे, अयोग्य विचार किंवा प्रतिक्रिया आल्यास संबंधित साधक आणि प.पू. डॉक्टर यांची मानस क्षमायाचना करणे, ते विचार कागदावर लिहून कापराने जाळणे, स्वयंसूचना सत्र करणे, मोकळेपणाने बोलणे’, असे प्रयत्न होऊ लागले.

३. हातावर ‘ॐ’ उमटणे आणि ऊर्जा जाणवणे 

वर्ष २०२०, वर्ष २०२२ आणि वर्ष २०२३ मध्ये माझ्या उजव्या हातावर ‘ॐ’ उमटले. ‘माझ्या हातावर ‘ॐ’ उमटला आहे’, हे मला बाह्यतः कधीच शोधावे लागले नाही. मला ‘शरिरावर ॐ’ उमटला आहे’, अशी जाणीव अंतर्मनातून आपोआपच होते आणि त्या ठिकाणी पाहिल्यावर ‘ॐ’ उमटलेला असतो. माझ्या शरिरावर ‘ॐ’ उमटतांना आणि उमटल्यावर मला वेगळीच ऊर्जा जाणवत असते.

४. काळानुसार स्वतःत जाणवलेले पालट

अ. वर्ष २०२० मध्ये मी घरून येऊन-जाऊन आश्रमात सेवा करत होते. त्या वेळी मला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास झाल्यास माझ्याकडून थोड्याफार प्रमाणात त्रासाशी लढण्याचा भाग होत होता. मला आश्रमातील चैतन्य ग्रहण करता येत होते. माझ्याकडून नामजपादी उपाय करण्याचे प्रयत्न होत होते; पण मला ते अधिक वेळ करणे जमत नव्हते.

आ. वर्ष २०२२ मध्ये आम्ही दोघेही (मी आणि माझे यजमान श्री. अभिजीत) स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत होतो. त्या वेळी माझे मन पुष्कळ सकारात्मक होते. माझा आध्यात्मिक त्रासाशी लढण्याचा भागही पूर्वीच्या तुलनेत वाढला होता. माझे नामजपादी उपाय पूर्ण होत होते; पण ते मनापासून होत नव्हते.

इ. वर्ष २०२३ मध्ये आम्ही पूर्णतः आश्रमजीवन स्वीकारले. या वेळी माझा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांशी लढण्याचा भाग पुष्कळ वाढला.

५. एका संतांच्या सत्संगात अनुभवलेली स्थिती 

अ. एकदा एका संतांच्या सत्संगात मला थोडा आध्यात्मिक त्रास झाला; मात्र मला आनंदही जाणवत होता. या सत्संगाच्या आधीपासून मला हृदयात प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवू लागले. मला सत्संगातील चैतन्य सहन करता आले. सत्संग झाल्यानंतर मला थकवा आला. माझ्या मनातील विचारांचे प्रमाण वाढले आणि मला आध्यात्मिक त्रास झाला.

आ. नंतर मला लाभलेल्या संतांच्या सत्संगात मला आध्यात्मिक त्रास अल्प प्रमाणात झाला. त्या सत्संगात मला पुष्कळ आनंद जाणवत होता. मला हृदयातील प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व अधिक प्रमाणात जाणवू लागले. हातावर ‘ॐ’ उमटला. सत्संग झाल्यानंतर मला त्रास झाला नाही.

इ. एकदा संतांच्या सत्संगात मला पुष्कळ आनंद अनुभवता आला. मी स्थिरता अनुभवत होते. सत्संग झाल्यानंतर मला त्रास झाला नाही.

एकदा प.पू. डॉक्टरांना माझ्या हातावर ‘ॐ’ उमटले आहेत , असे समजल्यावर ते म्हणाले, ‘‘आपल्याकडे असे दुसरे कुणीही नाही !’’

६. सध्याची स्थिती 

अ. मला शारीरिक त्रास पुष्कळ होत असल्यासही मी नियमित आश्रमात येऊन ठरलेल्या वेळेत सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. मी त्यात सवलत घेत नाही.

आ. माझा प्रसंगात स्वीकारण्याचा आणि ऐकण्याचा भाग वाढला आहे. माझ्याकडून प्रत्येक प्रसंगात सकारात्मक रहाण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतात.

इ. मला त्रास होत असल्यास मी साधिकेशी बोलते आणि नामजपादी उपाय पूर्ण करते.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभण्याविषयी झालेली विचारप्रक्रिया आणि स्वतःत जाणवलेले पालट 

७ अ. ‘प.पू. डॉक्टरांचा सत्संग लाभावा’, असे वाटणे, म्हणजे ‘साधना करा’, असे सांगूनही तसे परिपूर्ण प्रयत्न न करता देवाची भेट मात्र आधी मिळाली पाहिजे’, असे वाटणे : एकदा माझ्या मनात ‘मला प.पू. डॉक्टरांचा सत्संग लाभणार कि नाही ? ते कधी भेटणार ?’, असा विचार येऊन मला वाईट वाटले. त्या वेळी माझ्या मनात लगेचच विचार आले, ‘असे वाटणे, म्हणजे वर्षभर अभ्यास करा, असे सांगूनही न ऐकता परीक्षेत पहिला क्रमांक पाहिजे, असे झाले ना !’, म्हणजे ‘साधना करा’, असे सांगूनही तसे परिपूर्ण प्रयत्न न करता देवाची भेट मात्र आधी मिळाली पाहिजे’, असे वाटणे होय.’ तेव्हा मी ठरवले, ‘साधनेचे सांगितलेले प्रयत्न प्रामाणिकपणे करूया.’ मी तसे प्रयत्न जोरात चालू केले.

७ आ. स्वतःत जाणवलेले पालट

१. मला ‘प.पू. डॉक्टर भेटावेत’, असे वाटणे न्यून होऊन मला शांत आणि स्थिर वाटू लागले.

२. अनेक साधक मला ‘‘तुम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला का?’’, असे विचारत होते. त्या वेळी मी त्यांना ‘नाही’, असे सांगत होते. अनेक साधक मला पाहून ‘तुम्ही यापूर्वी प.पू. डॉक्टरांच्या सत्संगाला गेला आहात’, असे सांगत होते.

(मी सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांशी बोलले आणि त्यांना भेटले होते.) यासंदर्भात एक म्हणाले, ‘‘तुमची प.पू. डॉक्टरांशी सूक्ष्मातून भेट होते, ते इतरांनाही समजायला लागले.’’

– सौ. जान्हवी विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.३.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक