हिंदूंचे प्राचीन पवित्र स्थान ‘नैमिषारण्य’ याची झालेली दुरावस्था !

हिंदूंचे प्राचीन धार्मिक स्थान ‘नैमिषारण्य’

१. ‘उत्तरप्रदेशामधील हिंदूंचे प्राचीन धार्मिक स्थान ‘नैमिषारण्य’ याचे स्थानमहात्म्य !

‘आम्हाला ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आयोजित केलेल्या दौर्‍याअंतर्गत उत्तरप्रदेशामधील प्राचीन धार्मिक स्थान ‘नैमिषारण्य’ येथे जाण्याचे भाग्य लाभले. हे ठिकाण पृथ्वीवरील महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणांपैकी एक आहे. हे ८८ सहस्र ऋषींचे तपस्थान आहे. येथे मनु आणि सतरूपा यांनी २३ सहस्र वर्षे तप केले आहे. व्यासांच्या कृपेने या पवित्र स्थानावर ‘सुतांनी शौनकादी ८८ सहस्र ऋषींना एक सहस्र वर्षे १८ पुराणे, चार वेद आणि भागवत कथा सांगितली. यासह सुतांनी ‘सत्यनारायण कथा’ही प्रथम याच ठिकाणी सांगितली. हे श्रवण करण्यासाठी ८८ सहस्र ऋषी २५२ किलो मीटरच्या परिसरात बसले होते.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

२. कुठे दैवी कथांच्या माध्यमातून नादाच्या स्तरावर जगत्कल्याणासाठी चैतन्यऊर्जा निर्माण करणारे ऋषी आणि महर्षि, तर कुठे कर्णकर्कश आवाजात ध्वनीक्षेपकांवर भजने लावून चैतन्य नष्ट करणारे तथाकथित भक्त ! 

आज या स्थानाची लोकांनी वाईट स्थिती केली आहे. पूर्वी ऋषी आणि महर्षि यांनी दैवी कथांच्या माध्यमातून नादाच्या स्तरावर जगत्कल्याणासाठी येथे चैतन्यऊर्जा निर्माण केली होती. तेथे आज आसुरी वृत्तीचे मानव त्या चैतन्याला नष्ट करत आहेत. स्थानमहात्म्यामुळे या परिसरात अनेक ठिकाणी सतत कथा आणि पुराणे यांचे पठण चालू असते. हे पठण मोठमोठ्या ध्वनीक्षेपकांवर अतिशय कर्णकर्कश आवाजात चालू असते. रात्री अपरात्रीही मोठ्या आवाजात हे सर्व चालू असते. काही वेळा ‘कथाकार काय पठण करत आहेत ?’, हे नीट कळतही नाही. त्याच्या जोडीला वाजंत्रीही असतात आणि आता तर ‘डीजे’ ध्वनीयंत्रणाही असते. कथेतील पुष्कळ भजने वेड्यावाकड्या चालीत गायिली जातात. लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक वेळा ही भजने चित्रपटातील गाण्यांच्या चालीवर रचलेली असतात. काही जण दारू पिऊन कथा ऐकायला येतात. येथे येणारे बहुतांश लोक मौज-मजा करणे, धांगडधिंगा करणे यातच मग्न असतात.

३. पंचमहाभूतांच्या स्तरांवरील युद्धांपैकी हे नादाच्या स्तरावरील युद्ध असणे 

ज्या ठिकाणी वातावरणात दैवी ऊर्जा नादस्वरूपात आहे, त्याच ठिकाणी असे कर्णकर्कश आवाजात अयोग्य पद्धतीने देवतांच्या कथांचे पारायण आणि भजने दिवस-रात्र चालू आहे. दैवी नाद आणि आसुरी नाद यांचे हे युद्धच आहे. पंचमहाभूतांच्या स्तरावरील युद्धांपैकी हे नादाच्या स्तरावरील युद्ध आहे. ही स्थिती केवळ येथेच आहे असे नाही, तर सर्वत्र असेच विदारक दृश्य पहायला मिळते. (‘हिंदूनो, आतातरी ही स्थिती सुधारा, अन्यथा संकटकाळात देव तुमच्याकडे लक्ष देईल का ?’ – संकलक )

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे माणसे योग्य कृती करण्याचे आणि त्याचे महत्त्वही विसरली आहेत. ‘अशा धार्मिक स्थळांचे पावित्र्य टिकवून ठेवणे आणि तेथील चैतन्याचा आपल्याला लाभ होईल’, यासाठी प्रयत्नशील रहाण्यासाठी जनमानसात जागृती करणे आवश्यक आहे.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, देहली