‘हिंदवी’ शब्द घातल्याचे लेखी उत्तर पाठवले !
मुंबई – ‘छावा’ या छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आगामी ऐतिहासिक हिंदी चित्रपटाच्या ट्रेलर (चित्रपटाचा सारांशरूपाने दाखवला जाणारा काही सेकंदाच्या विज्ञापनाचा व्हिडिओ)मध्ये ऐतिहासिक तथ्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचे लक्षात आले होते. मुंबईतील प्रसिद्ध बालमोहन विद्यामंदिरातील इतिहास विषयाच्या आदरणीय शिक्षिका श्रीमती शीला उमेश पाटील यांनी याविषयी आक्षेप नोंदवले होते.
‘हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा’ असा संवाद होता. तो मूळ इतिहास आणि ग्रंथ यांनुसार ‘हे हिंदवी राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा’ असे त्यांचे म्हणणे होते. ‘ही दुरुस्ती केवळ एका संवादाची नाही, तर इतिहास सत्य रूपात जतन करण्यासाठी आहे’, असे आक्षेप घेणार्यांनी म्हटले होते.
अधिवक्त्या सुरभी सावंत आणि प्रथमेश गायकवाड यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटिशीनंतर ‘मॅडॉक फिल्म्स’ यांनी त्यांना ई-मेलद्वारे ‘आम्ही आपल्या पत्रामध्ये नमूद केलेला संवाद विचारपूर्वक दुरुस्त करून ‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा’ हा संवाद चित्रपटाच्या दृश्यांमध्ये समाविष्ट केला आहे’, असे उत्तर पाठवले.
अभिनेते विकी कौशल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. सुधारित संवादासह छावा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ या दिवशी प्रदर्शित होणार आहे. संबंधित अधिवक्ता प्रदर्शित चित्रपट पाहून पालट केल्याची निश्चिती करणार आहेत.