प्रयागराज कुंभपर्व २०२५
|

प्रयागराज (उत्तरप्रदेश), ११ फेब्रुवारी (वार्ता.) : भाविकांना महाकुंभक्षेत्री त्रिवेणी संगमावर स्नानासाठी घेऊन जाण्यासाठी खासगी आणि शासकीय होडीवाल्यांनी प्रति भाविक १५० रुपये घ्यावेत, असा शासकीय नियम आहे. असे असले, तरी या नियमाला वाटाण्याच्या अक्षता लावत होडीवाले प्रति व्यक्ती २ सहस्र ते ५ सहस्र रुपये भाडे आकारून त्यांना लुटत आहेत. भाविकांनी अल्प पैसे घेण्याविषयी अनेकदा विनवण्या करूनही होडीवाले त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. याविषयी संगमावरील पोलिसांना विचारले असता, ते म्हणतात की, ‘भाविकांना होडीतून जायचे नसेल, तर त्यांनी पायी जावे !’
होडीचालकांकडून ४ जणांच्या कुटुंबासाठी १० ते १२ सहस्र रुपयांची मागणी !
संगमावर जाण्यासाठी लोक होडीसाठी रांगा लावत आहेत. होडीची वाट पहाण्यात घंटोन्घंटे लागत आहेत. ४ जणांच्या कुटुंबासाठी १० ते १२ सहस्र रुपये भाडे घेतले जात आहे. ‘बोट क्लब घाटा’त पोचताच जम्मू-काश्मीरहून आलेले सुभाषचंद्र शर्मा म्हणाले की, संगमस्नानासाठी ४ जणांकडून ८ सहस्र रुपये घेण्यात आले. बोट क्लब ते त्रिवेणी घाटापर्यंतचे हे केवळ होडीचे भाडे आहे. अनेक होडीचालक १० ते १२ सहस्र रुपये मागत आहेत. संगमावर होडीचालकांना पत्रकारांनी ‘भाविकांकडून किती भाडे आकारता ?’, असे विचारल्यास होडीचालक त्याकडेही दुर्लक्ष करत आहेत, असे चित्र आहे. होडी आल्यावर त्यात बसण्यासाठी चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. अनेकांना एवढे पैसे भरल्यानंतरही होडीत बसायला जागाही मिळत नाही. भाविकांनी सांगितले की, होडीचालक अनेकदा पकडले जाऊ नये म्हणून नदीच्या मध्यभागी पैशांची देवाण-घेवाण करत आहेत. होडीत चढण्यापूर्वी भाविकांना हळू आवाजात भाडे सांगितले जाते. पैशाविषयी मोठ्याने बोलणार्यांना होडीत बसू दिले जात नाही.
तक्रार केल्यावर पोलिसांचा भाविकांवरच संताप !
भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे; मात्र होडीचालकांच्या मनमानीविषयी भाविकांनी तक्रारी केल्यास पोलीस कर्मचारीच भाविकांवर संताप व्यक्त करत आहेत. बंदोबस्तातील पोलीस उपनिरीक्षक दिनेशकुमार मिश्रा यांच्याकडे तक्रार केल्यावर ते भाविकांना संतापून म्हणाले, ‘पैसे द्यायचे नसतील, तर पायी चालत जावा. खासगी होडींवर आमचे नियंत्रण नाही.’
भाविकांनी तक्रार करावी, योग्य ती कारवाई केली जाईल ! – विवेक चतुर्वेदी, अतिरिक्त न्यायाधिकारी
होडीचालकांकडून आकारण्यात येणार्या मनमानी भाड्याविषयी विचारले असता अतिरिक्त न्यायाधिकारी विवेक चतुर्वेदी म्हणाले की, अधिक भाडे आकारणे अनधिकृत आहे. कोणत्याही होडीचालकाने ठरलेल्या शुल्कापेक्षा अधिक भाडे आकारल्यास भाविकांनी तक्रार करावी. तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल. (दिवसाढवळ्या होडीचालकांचा मनमानी कारभार दिसत असतांना पोलिसांनी स्वत:हून त्यात लक्ष घालून कारवाई केली पाहिजे. भाविकांकडून तक्रारीची अपेक्षा करणे, ही दायित्वशून्यता नव्हे काय ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|