महाकुंभमेळ्यात प्रवेशाच्या मार्गात अड्डा करून मद्यपींचे दिवसाढवळ्या मद्यपान !

पोलिसांची बघ्याची भूमिका

प्रयागराज, १० फेब्रुवारी (वार्ता.) – ज्या मार्गावरून भाविक महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात प्रवेश करतात, त्या मार्गावर म्हणजेच झुँसी मार्गाच्या ठिकाणी अड्डे करून मद्यापी दिवसाढवळ्या मद्यपान करत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी पोलीस असूनही ते याकडे दुर्लक्ष करत आहेत.

रेल्वेने येणारे भाविक झूँसी या ठिकाणाहून महाकुंभमेळ्यात प्रवेश करतात. या मार्गावर काही मद्याची दुकाने आहेत; मात्र त्यांना तेथे बसून मद्य पिण्यासाठी परमिट रूमची अनुमती नाही. या मद्याच्या दुकानांमध्ये मद्य पिऊन मद्यापी कुंभक्षेत्रात जाणार्‍या भाविकांसमक्ष मद्यमान करत आहेत. रस्त्याच्या कडेला, रस्त्यालगत असलेली उद्याने येथे एकत्रित बसून पोलिसांना न जुमानता मद्यपी निर्धास्त मद्य पीत आहेत. ‘पोलीस आणि प्रशासन यांनी यात लक्ष घालून हा अपप्रकार रोखावा’, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांच्या नाकासमोर असे घडत असेल, तर भ्रष्टाचार करून पोलिसांनी त्याला अनुमती दिली आहे, असे समजायचे का ?