इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरोधात जारी करण्यात आले होते अटक वॉरंट !
(वॉरंट म्हणजे आदेश)
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालया’वर (इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट – ‘आयसीसी’वर) निर्बंध घालण्याचा आदेश दिला. त्यांनी ‘आयसीसी’ अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांसह अन्वेषणात साहाय्य करणार्या अमेरिकेतील प्रत्येकाची मालमत्ता गोठवण्याचे अन् प्रवासबंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी आदेशात म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्रायल या न्यायालयाचे सदस्य नाहीत अन् ते त्याला मान्यता देत नाहीत. ‘आयसीसी’ने अधिकारांचा गैरवापर केला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि माजी संरक्षणमंत्री योव गॅलंट यांच्याविरुद्ध ‘आयसीसी’ने अटक वॉरंट जारी केल्यानंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले. २१ नोव्हेंबर २०२४ या दिवशी ‘आयसीसी’ने नेतान्याहू आणि गॅलंट यांच्याविरुद्ध युद्ध गुन्हे, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि गाझामधील नरसंहार या आरोपांखाली अटक वॉरंट जारी केले. नेतान्याहू सध्या अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. त्यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी व्हाईट हाऊसमध्ये (अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान) ट्रम्प यांची भेट घेतली होती.