Prayagraj MahaKumbh Stampede Inquiry : आतंकवादविरोधी पथकाचे १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

  • महाकुंभ येथील चेंगराचेंगरीचे प्रकरण

  • अपघात नव्हे, तर कट असल्याचा संशय, अन्वेषण यंत्रणाकडून चौकशी चालू !

  • नागरिकत्व सुधारणा कायदद्याला विरोध करणार्‍या आंदोलनकर्त्यांवर विशेष लक्ष !

प्रयागराज – महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे प्रकरण अपघात नव्हे, तर त्यामागे कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात आतंकवादीविरोधी पथक आणि इतर सुरक्षायंत्रणा यांनी अनुमाने १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष ठेवले आहे. विशेषतः सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा) आणि एन्.आर्.सी. (राष्ट्रीय नागरिक नोंदणी) विरोधातील आंदोलनात सक्रीय असलेल्या लोकांवर विशेष लक्ष दिले जात आहे. अन्वेषणात अहिंदु लोक निदर्शनास आले आहेत, जे लोक सामाजिक माध्यमांवर महाकुंभाविषयी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करत होते, तसेच काही जणांनी ‘गुगल आणि यू ट्यूब’वर महाकुंभ पहाण्यासाठी अधिक वेळा सर्च केले आहे. त्यांचे अन्वेषण केले जाणार आहे. १८ जिल्ह्यातील ‘पी.एफ्.आय.’च्या (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या)  सदस्यांची चौकशी केली जात आहे.

१. चेंगराचेंगरीसह महाकुंभ मेळ्यात १९ जानेवारी या दिवशी लागलेल्या आगीच्या घटनेची पडताळणी सुरक्षायंत्रणा सखोलपणे करत आहेत.

२. वाराणसी येथे ७० संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मध्य आणि पश्‍चिम उत्तरप्रदेशातील कारागृहांधील काही संशयितांची माहिती मागवण्यात आली आहे.

३. वाराणसी येथील जैतपुरा येथील सिराजुद्दीन याला नोटीस बजावली होती. ३ फेब्रुवारी या दिवशी त्याला अशोक विहार कॉलनीतील आतंकवादविरोधी पथकाच्या कार्यालयात बोलावून ३ घंट्यांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. सिराजुद्दीन १९ जानेवारी या दिवशी महाकुंभ मेळा क्षेत्रात उपस्थित होता आणि त्याने सामाजिक माध्यमांवर थेट प्रक्षेपण करून तेथील माहिती प्रसारित केली होती.

४. महाकुंभ मेळा क्षेत्रातील ६०० सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यात आले आहेत, ज्यामध्ये काही संशयित व्यक्ती दिसून आल्या आहेत. त्यांच्या ओळखींसाठी ८ पथके कार्यरत आहेत.

महत्त्वाच्या गोष्टी…

१. सामाजिक माध्यमांवर महाकुंभाविषयी माहिती पहाणारे बहुतांश अहिंदु आहेत.

२. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधासाठी आयोजित आंदोलनात सहभागी होणारे लोक महाकुंभ येथे आले होते.

३. ज्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे, असे लोक महाकुंभ येथे आले होते.

४. गैरहिंदु लोक महाकुंभाचे थेट प्रेक्षपण पहात होते. सरकारच्या विरोधात आंदोलन करणारे लोक महाकुंभात सहभागी झाले होते.