५४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली मालेगाव (जिल्‍हा नाशिक) येथील चि. काश्‍वी नीलेश चौधरी (वय २ वर्षे)!

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! चि. काश्‍वी चौधरी ही या पिढीतील एक आहे !

 (काश्‍वी हे श्री वैभवलक्ष्मीदेवीचे एक नाव आहे.)

चि. काश्‍वी चौधरी

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. जन्‍मापूर्वी

आधुनिक वैद्या (सौ.) शीतल चौधरी

अ. एक दिवस सायंकाळी ‘माझ्‍यावर पुष्‍कळ प्रमाणात काळ्‍या (त्रासदायक) शक्‍तीचे आवरण आले आहे’, असे मला जाणवत होतेे आणि थकवाही जाणवत होता. तेव्‍हा मी पोटावर ‘पू. वामन (राजंदेकर) यांचा नामकरण विधी अन् त्‍यांना ‘संत’ घोषित केल्‍याचा सोहळा’ हा ग्रंथ ठेवला. तेव्‍हा मला दैवी सुगंध आला. त्‍यानंतर ‘गर्भाला पुष्‍कळ आनंद होत असून गर्भ पू. वामनदादांच्‍या समवेत आनंदाने खेळत आहे’, असे मला जाणवले.

आ. त्‍या ग्रंथाच्‍या मुखपृष्‍ठाकडे पाहिल्‍यावर ‘पू. वामनदादा मला पाहून हसत आहेत आणि ते माझ्‍यासमोर सूक्ष्मातून उपस्‍थित आहेत’, असे मला वाटते.

इ. मला रात्री झोपेतून जाग आल्‍यावर माझ्‍या मनात पुष्‍कळ अनावश्‍यक विचार येत असत. एकदा माझ्‍या मनात विचार येत असतांना मी पू. वामनदादांच्‍या छायाचित्रावर हात ठेवून डोळे मिटले. तेव्‍हा एकाएकी मला माझ्‍या विचारांमध्‍ये पुष्‍कळ पालट जाणवला आणि मला शांत झोप लागली.’

– आधुनिक वैद्या (सौ.) शीतल नीलेश चौधरी (चि. काश्‍वीची आई), मालेगाव, जि. नाशिक.

ई. ‘सौ. शीतलने तिला गर्भधारणा झाल्‍याचे सांगितल्‍यावर माझ्‍या मनात ‘ईश्‍वरी’ हे नाव आले आणि ‘तुला दैवी बालिका होणार’, असे माझ्‍याकडून उत्‍स्‍फूर्तपणे सांगितले गेले.

उ. सौ. शीतल बाळंतपणासाठी माहेरी आली असतांना ती पुष्‍कळ आनंदी होती. तिच्‍याकडे पाहून ‘गर्भही आनंदी आहे’, असे मला जाणवायचे.

२. जन्‍म ते ६ मास

सौ. सत्‍याली देव

अ. शीतल रुग्‍णालयात असतांना मी तिला २ – ३ दिवस भेटायला गेले असतांना मी बालिकेला घेऊन प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने म्‍हणत असे. मी ‘‘प.पू. गुरुदेव, आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना प्रार्थना करूया’’, असे म्‍हणून प्रार्थना करत असे. तेव्‍हा ‘बालिकेला ते समजत आहे’, असे मला जाणवायचे. बालिका ते शांतपणे ऐकत असे.’

– सौ. सत्‍याली देव (साधिका), चंद्रपूर

आ. ‘चि. काश्‍वी १ मासाची असतांना रडत असल्‍यास आम्‍ही तिला श्रीराम आणि श्रीकृष्‍ण यांचा पाळणा ऐकवत असू. ते ऐकून तिचे रडणे थांबायचे. ती कृतज्ञतागीत ऐकत शांत झोपत असे. आमच्‍या घरात प.पू. गुरुदेव (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे रथोत्‍सवातील छायाचित्र लावले आहे. काश्‍वीला हे छायाचित्र दाखवल्‍यावर ती त्‍या छायाचित्राकडे एकटक पहात असे. ती त्‍या छायाचित्राकडे पहात झोपी जात असे.

इ. काश्‍वी एक मासाची असतांना पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत, वय ७४ वर्षे) आमच्‍या घरी आले होते. तेव्‍हा ती शांतपणे झोपली होती. आम्‍ही तिला उठवण्‍यासाठी पुष्‍कळ प्रयत्न करूनही ती उठली नाही. तेव्‍हा पू. काकांनी त्‍यांचा हात तिच्‍या हृदयावर ठेवला. त्‍यांनी सांगितले, ‘‘काश्‍वी सतत ध्‍यानावस्‍थेत असते. तिच्‍या हातांच्‍या बोटांची मुद्रा केलेली असते.’

– आधुनिक वैद्या (सौ.) शीतल नीलेश चौधरी

ई. ‘काश्‍वीची आकलनक्षमता चांगली आहे. ती साडेतीन मासांची असतांना मी तिला खेळवतांना ‘सा, रे, ग, म ऽऽ’  असे स्‍वर किंवा ‘ॐ’ म्‍हटल्‍यावर ती शांतपणे ऐकत असे आणि नंतर ‘सा ऽऽ, ॐ ऽऽ’ असे म्‍हणण्‍याचा प्रयत्न करत असे.’ – सौ. सत्‍याली देव

उ. ‘काश्‍वी ५ मासांची असतांना दत्तजयंती होती. माझा दत्तजयंतीनिमित्त उपवास होता. या वेळी घरातील व्‍यक्‍ती ग्रंथप्रदर्शनाच्‍या सेवेसाठी गेल्‍या होत्‍या. मला देवासाठी नैवेद्य करायचा होता. मी काश्‍वीला पाळण्‍यात ठेवून पाळणा स्‍वयंपाकघरात घेऊन आले. मी काश्‍वीला सांगितले, ‘‘बेटा, मला प.पू. गुरुदेवांसाठी प्रसाद बनवायचा आहे. मला प्रसाद बनवू दे.’’  तेव्‍हा ती माझ्‍याकडे बघून स्‍मितहास्‍य करत होती आणि खेळत होती.

मी प्रसाद बनवल्‍यानंतर तिच्‍याकडे बघितल्‍यावर मला तिच्‍यामध्‍ये दत्तगुरूंचे बालरूप दिसले. ते पाहून माझी भावजागृती झाली. ‘माझ्‍या गुरूंनी मला दर्शन दिले’, हे पाहून मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.’ – आधुनिक वैद्या (सौ.) शीतल नीलेश चौधरी

श्री. गुणवंत चंदनखेडे

ऊ. ‘मी पूजा करत असतांना ती रांगत येऊन माझ्‍या मांडीवर बसायची. तेव्‍हा तिचा देवाप्रतीचा भाव पाहून मला कुतूहल वाटत असे.’ – श्री. गुणवंत चंदनखेडे (चि. काश्‍वीचे आजोबा, आईचे वडील ), चंद्रपूर

ए. ‘एकदा काश्‍वीची आई बाहेर गेली होती. तेव्‍हा मी काश्‍वीला झोपाळ्‍यात ठेवले आणि मी तिला ‘‘तुझ्‍या समवेत गुरुमाऊली आहे, श्रीकृष्‍ण आहे. तू झोप लवकर’’, असे सांगताच क्षणी ती लगेच झोपली. तिच्‍या दोन्‍ही हातांचे अंगठे आणि तर्जनी यांची ध्‍यानमुद्रा होती.

ऐ. मी सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावल्‍यावर तिला दिव्‍याकडे पाहून पुष्‍कळ आनंद होतो.

ओ. एकदा सद़्‍गुरु स्‍वाती खाडये आमच्‍याकडे आल्‍या होत्‍या. तेव्‍हा दोघींची पूर्वीपासूनची ओळख असल्‍याप्रमाणे काश्‍वी सद़्‍गुरु स्‍वातीताईंना प्रतिसाद देत होती. सद़्‍गुरु स्‍वातीताईंनी सांगितले, ‘‘बाळ दैवी आहे.’’

औ. पू. अशोक पात्रीकर आमच्‍या घरी आले असतांना काश्‍वी त्‍यांच्‍याशी खेळत होती.’
– सौ. सुषमा चंदनखेडे (चि. काश्‍वीची आजी, आईची आई), चंद्रपूर

३. वय ६ मास ते १ वर्ष ६ मास 

सौ. सुषमा चंदनखेडे

अ. ती ७ मासांची असतांना एकदा आम्‍ही घराजवळच्‍या राधाकृष्‍ण मंदिरात गेलो होतो. तेव्‍हा ती एकटक मूर्तीकडे पहात होती आणि काही वेळानंतर ती देवाकडे पाहून हसू लागली.

आ. एकदा मी काश्‍वीला खायला दिल्‍यावर ती खात नव्‍हती. तेव्‍हा मी ‘वदनी कवळ घेता…’ हा श्‍लोक म्‍हटला. त्‍या वेळी काश्‍वीने सगळा खाऊ पटापट संपवला. मी श्‍लोक म्‍हटल्‍यावरच ती खाते.

इ. काश्‍वी झोपलेली असतांना तिच्‍याकडे पाहिल्‍यावर ‘ती डोळे मिटून नामजप करत आहे’, असे जाणवते.

ई. काश्‍वी ९ मासांची असतांना एकदा सायंकाळी फार रडत होती आणि चिडचिडही करत होती. मला ‘काय करावे ?’, ते सुचत नव्‍हते. तेव्‍हा माझ्‍या आईने सांगितल्‍यानुसार मी ‘यु ट्यूब’वर कु. प्रार्थना पाठक (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय १३ वर्षे) या दैवी बालसाधिकेची ध्‍वनीचित्रश्रीत लावली. तेव्‍हा काश्‍वी शांतपणे ध्‍वनीचित्रश्रीत पहात होती. ती प्रार्थनाकडे पाहून स्‍मितहास्‍य करत होती आणि आनंदाने उड्या मारत होती.

उ. एकदा आम्‍ही काश्‍वीला लस देण्‍यासाठी चिकित्‍सालयात घेऊन गेलो होतो. त्‍या आधुनिक वैद्यांच्‍या खोलीत ‘श्री स्‍वामी समर्थ’ हा नामजप चालू होता. काश्‍वीला ते फार आवडलेे. ती अन्‍य मुलांप्रमाणे चिकित्‍सालयात गेल्‍यावर रडली नाही. काश्‍वीला इंजेक्‍शन दिल्‍यावरही ती केवळ ४ – ५ सेकंद रडली असावी. त्‍यानंतर ती लगेच हसायला आणि खेळायला लागली. आधुनिक वैद्यांनाही काश्‍वीचे फार कौतुक वाटले.

ऊ. ती १० मासांची असल्‍यापासून तिला घोषणा द्यायला फार आवडतात. आम्‍ही ‘जय श्रीराम’ असे म्‍हणाल्‍यावर ती दोन्‍ही हात वर करून क्षात्रभावाने प्रतिसाद देते.

ए. आमच्‍या घरी प.पू. गुरुदेवांचे रथोत्‍सवाच्‍या वेळी काढलेले छायाचित्र आहे. ‘काश्‍वी त्‍या छायाचित्राकडे पाहून त्‍यांच्‍याशी काहीतरी बोलत असते’, असे मला जाणवते. तिला कुणी ‘‘गुरुदेव कुठे आहेत ?’’, असे विचारल्‍यास पूर्वी ती त्‍या छायाचित्राकडे बोट दाखवत असे आणि काही दिवसानंतर ती सगळीकडे हात गोल फिरवू लागली. जणू तिला सांगायचे असते, ‘गुरुदेव सगळीकडे आहेत.’

ऐ. कुणी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ असे म्‍हटल्‍यावर ती श्रीकृष्‍णाच्‍या चित्राकडे पाहून टाळ्‍या वाजवते.

ओ. आमच्‍या घराच्‍या खिडकीतून समोरच्‍या घरावरील भगवा ध्‍वज दिसतो. काश्‍वी खिडकीतून त्‍या ध्‍वजाकडे अधूनमधून पहात असते. आम्‍ही तिला ‘‘काय पहातेस ?’’ असे विचारल्‍यास ती भगव्‍या झेंड्याकडे बोट दाखवून जयघोष केल्‍याप्रमाणेे हात वर करते.’
– आधुनिक वैद्या (सौ.) शीतल नीलेश चौधरी, मालेगाव

औ. ‘काश्‍वी प्रेमळ आहे.

अं. मला आलेला थकवा तिचे गोड हसणे बघून दूर होतो. मला ‘तिच्‍या समवेत खेळतच रहावे’, असे वाटते.’

– श्री. गुणवंत चंदनखेडे (चि. काश्‍वीचे आजोबा, आईचे वडील ), चंद्रपूर

क. ‘मोठी मुले ज्‍याप्रमाणे लेखणी (पेन) पकडतात, त्‍याप्रमाणे काश्‍वी १० मासांची असल्‍यापासून लेखणी पकडते.’
– सौ. सुषमा चंदनखेडे

‘हे गुरुमाऊली, केवळ तुमच्‍याच कृपेने काश्‍वीचे गुण आमच्‍या लक्षात आले’, त्‍याबद्दल मी आपल्‍या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

४. काश्‍वीचे स्‍वभावदोष : हट्टीपणा’ 

– सौ. शीतल निलेश चौधरी

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २२.७.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.