श्री. महेश पाठक यांना ४५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभेच्छा !
पुणे येथील श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी, ६८ टक्के, वय ४५ वर्षे) यांचा फाल्गुन कृष्ण अष्टमी (२२.३.२०२५) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. श्री. महेश सरवटे (वय ४३ वर्षे), तळेगाव, जिल्हा पुणे
१ अ. साधकांवर विश्वास ठेवून सेवेत सहभागी करून घेणे : ‘मी कोरोना महामारीनंतर तळेगाव (जिल्हा पुणे) येथे स्थलांतरीत झालो. तेव्हा ‘मला समष्टी सेवा मिळावी’, अशी मी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना करत होतो. त्यानंतर एका कार्यशाळेत माझी श्री. महेश पाठक यांची भेट झाली. महेशदादांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला धर्मप्रसाराच्या सेवांमध्ये सहभागी करवून घेतले. त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे माझा आत्मविश्वास वाढला.
१ आ. साधकांशी जवळीक असणे : दादांमधील ‘सहजता’ या गुणामुळे त्यांच्याशी बोलतांना मोकळेपणा जाणवतो. ते अगदी लहान मुलांसमवेतही मुलांसारखे होऊन रहातात. ते प्रत्येक साधकाला आपलेसे करतात.
१ इ. दादा सेवेत येणार्या अडचणींचा वस्तूनिष्ठ अभ्यास करून त्यावर त्वरित उपायही सांगतात.
१ ई. दादा व्यस्त असले, तरी साधकांना वेळ देतात.
१ उ. दादा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती भाव ठेवून सेवा करतात.’
२. कु. प्राची शिंत्रे, पुणे
२ अ. इतरांचा विचार करणे : ‘एका सेवेच्या नियोजनासाठी आम्ही काही साधक महेशदादांसह एकत्र बसलो होतो. आमचे बोलणे चालू झाल्यावर काही साधक तेथे आले. तेव्हा दादांनी नंतर आलेल्या साधकांसाठी आरंभीपासूनची सूत्रे सांगितली.
२ आ. आधार वाटणे : दादा त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून आणि बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला कार्यात सहभागी करून घेतात. दादांची साधक आणि धर्मप्रेमी यांच्याशी पटकन जवळीक होते. त्यामुळे दादांचा साधकांना आधार वाटतो.
२ इ. अहंशून्यता : दादा उच्चशिक्षित आहेत. ते एका ‘सॉफ्टवेअर’ आस्थापनात उच्च पदावर कार्यरत होते. ते नोकरीनिमित्त काही वर्षे अमेरिकेत होते, तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात कोणताही अहं जाणवत नाही.
२ ई. दादा त्यांच्याकडून झालेली चूक प्रांजळपणे स्वीकारतात.
२ उ. साधकांना सेवेत साहाय्य करणे
१. दादा साधकांना ‘सेवा कशी करावी ?’ यांविषयी सोप्या पद्धतीने आणि नेमकेपणाने सांगतात. त्यामुळे साधकांना सेवेतून आनंद मिळतो.
२. रामनाथी (गोवा) येथे होणार्या एका शिबिरासाठी पुण्यातील २ साधिकांना जायचे होते; परंतु त्या साधिकांच्या घरी काही अडचणी आल्या होत्या. दादांनी त्या साधिकांना भेटून त्यांच्या अडचणीवर उपाय काढला. त्यामुळे त्या साधिकांना शिबिरासाठी जाता आले.
२ ऊ. सेवाभाव : दादा प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी स्वच्छतेपासून आवराआवरीपर्यंतच्या सर्व सेवांमध्ये सहभागी होतात. एखाद्या कार्यक्रमात दादांची वक्ता म्हणून सेवा असली, तरी ते कार्यक्रमाच्या पूर्वसिद्धतेच्या सेवांमध्ये सहभागी होतात. ते पुणे येथील सेवाकेंद्रातही अनेक सेवा करतात.
२ ए. गुरूंप्रती भाव : एकदा हिंदु राष्ट्र अधिवेशनात दादा गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) शुभसंदेशाचे वाचन करत होते. त्यातील शेवटचा परिच्छेद वाचतांना दादांचा कंठ दाटून आला. दादांचा गुरुदेवांप्रती भाव असल्यामुळे त्यांच्या वाणीत चैतन्य जाणवते.’
३. कु. स्नेहल मुळूक, पुणे
३ अ. इतरांचा विचार करणे : ‘एकदा चिंचवड येथे एक आंदोलन झाल्यावर दादा मला पुण्याला गाडीतून सोडणार होते; परंतु त्यांना अन्य सेवा आल्यामुळे माझे त्यांच्या समवेत जाणे रहित झाले. तेव्हा मी बसने पुण्यात गेले. दुसर्या दिवशी दादांनी मला स्वत:हून भ्रमणभाष करून माझी क्षमा मागितली.
३ आ. गुरूंप्रती भाव : दादा एखादे अधिवेशन, मंदिर परिषद किंवा गुरुपौर्णिमा यांमध्ये गुरुदेवांच्या संदेशाचे वाचन करतात. त्या वेळी त्यांच्यातील भावामुळे ‘गुरुदेवच प्रत्यक्ष बोलत आहेत’, असे मला जाणवते.’
४. कु. क्रांती पेटकर, पुणे
४ अ. साधकांशी जवळीक साधणे : ‘दादांशी बोलतांना मला ताण येत नाही. त्यांना कोणतीही अडचण मला मनमोकळेपणाने सांगता येते. त्यामुळे ‘दादा केवळ उत्तरदायी साधक नसून आध्यात्मिक बंधू आहेत’, असे मला वाटते.
४ आ. सेवाभाव : दादा स्वतःचा किंवा स्वसुखाचा विचार न करता कोणतीही सेवा तळमळीने आणि आनंदाने करतात.
४ इ. दादा कोणत्याही परिस्थितीत स्थिर आणि सकारात्मक असतात.’
५. श्री. शशांक सोनवणे, पुणे
५ अ. आपुलकी : ‘दादा भेटल्यावर ‘त्यांच्याशी मनातील सर्व विचार बोलावे’ असे मला वाटते.’
६. सौ. प्रीती कुलकर्णी, कोथरुड, पुणे
६ अ. प्रेमभाव : ‘दादा प्रत्येक साधकाशी नेहमी नम्रपणे आणि प्रेमाने बोलतात. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे ते सर्व साधक, धर्मप्रेमी आणि कुटुंबीय यांना आपलेसे करतात.
६ आ. घरकामात साहाय्य करणे : काही वर्षांपासून पू. मनीषाताई (सनातन संस्थेच्या १२३ व्या [समष्टी] संत पू. (सौ.) मनीषा पाठक, वय ४३ वर्षे) रुग्णाईत आहेत. तेव्हापासून दादा पू. ताईंचे औषधोपचार करणे, त्यांची काळजी घेणे, त्यांना जेवण देणे, तसेच मुलगी कु. प्रार्थना (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १४ वर्षे) हिचा शाळेचा डबा देणे, तिला शाळेत सोडणे इत्यादी कृती करत आहेत. दादांनी हे सर्व आनंदाने स्वीकारले असून त्यांच्यात सेवाभाव जाणवतो.’
७. सौ. अनुराधा तागडे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६९ वर्षे)
७ अ. संतांप्रती भाव : ‘सनातन संस्थेच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा पाठक (वय ४३ वर्षे) महेशदादांच्या पत्नी आहेत; तरीही दादा त्यांना ‘‘पू. मनीषा’’, असे म्हणतात. तेव्हा दादांचा त्यांच्याप्रती भाव जाणवतो.’
८. सौ. नेहा मेहता, पुणे
८ अ. सद्गुरु स्वाती खाडये यांच्याप्रती भाव असणे : ‘सद्गुरु स्वाती खाडये पुण्यात आल्यावर ‘त्यांचे सर्वकाही नियोजनाप्रमाणे होत आहे ना ?’ यांकडे महेशदादांचे लक्ष असते. दादा सद्गुरु ताईंचे आज्ञापालन करतात. त्यांच्यामध्ये सद्गुरु ताईंप्रती दास्यभाव आणि बालकभाव आहे’, असे मला जाणवते.
८ आ. अनेक दैवी गुण असणे : ‘दादांमध्ये कष्टाळूपणा, मनमोकळेपणा, प्रतिमा न जपणे, प्रेमभाव, साधकांना समजून घेणे, साधकांना सेवेत साहाय्य करणे, गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असणे, सद्गुरु आणि संत यांच्याप्रती उच्च भाव असणे, अहंशून्यता यांसारखे अनेक दैवी गुण आहेत’, असे मला वाटते.’
(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक : ७.३.२०२५)