पणजी, २७ जानेवारी (वार्ता.) – ‘ऑनलाईन’ जुगारात मोठ्या प्रमाणात पैसे गमावल्याने नैराश्येच्या आहारी गेलेला आणि सध्या वेलिंग, म्हार्दाेळ येथे भाड्याच्या खोलीत रहाणारा मूळचा ओडिशा येथील जगबंधु धनेश्वर नायक (वय २८ वर्षे) याने वेलिंग येथे रानात आत्महत्या केली. तो कुंडई येथील औद्योगिक वसाहतीत कामाला होता.
२६ जानेवारी या दिवशी वेलिंग येथील जंगलातून दुर्गंधी येत असल्याची माहिती काही स्थानिकांनी स्थानिक पंचसदस्य रूपेश नाईक यांना दिली आणि त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना तेथे सडलेल्या स्थितीत एक मृतदेह आढळला. याविषयी तात्काळ म्हार्दाेळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह कह्यात घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार जगबंधु धनेश्वर नायक बेपत्ता असल्याची तक्रार १६ जानेवारी या दिवशी फोंडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. संबंधित मृतदेह जगबंधु नायक याचा असल्याची खातरजमा त्याच्या एका मित्राने केली आहे. या मित्राकडून पोलिसांना मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार जगबंधु नायक याने त्याच्या कुटुंबियांना संपर्क करून ‘ऑनलाईन’ जुगारात पैसे गमावल्याची माहिती दिली होती आणि त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला आहे.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे युवा पिढी उद्ध्वस्त होत असतांना न्यायालयासह कोणतीच यंत्रणा ‘ऑनलाईन’ जुगारावर बंदी घालायला सिद्ध नाही आणि या जुगाराचे विज्ञापन करण्यावरही बंदी घातलेली नाही, हे देशाचे दुर्दैव ! |