(टीप : ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’, म्हणजे युद्धात माहिती, विचार आणि भावना यांचा वापर करून समाजातील लोकांचा विश्वास, निर्णय आणि कृती यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे !)
चीनचे भारताविरुद्ध ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ : भाग २
‘ना युद्ध ना शांतता काळात (no war no peace)’ शस्त्रांपेक्षा मनावर आक्रमणे करणारी शस्त्रे अधिक प्रभावी ठरत आहेत. ‘कॉग्निटिव्ह युद्ध’, म्हणजे मानवी मनाची शक्ती वापरून युद्ध लढणे. यात सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया), खोट्या बातम्या (फेक न्यूज), प्रचार (प्रोपागांडा), सायबर आक्रमणे आणि इतर अनेक तंत्रांचा वापर केला जातो. या युद्धात सत्य आणि असत्य यांची ओळख पटवणे कठीण होते.
‘कॉग्निटिव्ह युद्धा’मुळे समाजात विभाजन, राजकीय अस्थिरता निर्माण होते, मानवी हक्कांचे उल्लंघन होते. लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होतो आणि सायबर आक्रमणांमुळे आर्थिक हानी होते.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/877192.html
७. चीन आणि अमेरिका यांच्याकडून ‘कॉग्निटिव्ह युद्ध’
चीन सोशल मिडियाचा वापर करून त्याच्या शेजारील देशांमध्ये अस्थिरता निर्माण करतो. चीन ‘कॉग्निटिव्ह युद्धा’चा वापर करून आपल्या राजकीय आणि आर्थिक स्वार्थांना साध्य करण्याचा प्रयत्न करतो. अमेरिकाही ‘कॉग्निटिव्ह युद्धा’चा वापर करत आहे. अमेरिका आपल्या विरोधकांना अपकीर्त करण्यासाठी, आपल्या मित्रांना एकत्र करण्यासाठी ‘कॉग्निटिव्ह युद्धा’चा वापर करत आहे.
८. ‘कॉग्निटिव्ह युद्धा’चे विविध प्रकार ‘कॉग्निटिव्ह युद्ध’ हे एक अत्यंत व्यापक आणि गतिशील क्षेत्र आहे.
८ अ. प्रोपोगांडा :
८ अ १. सफेद प्रोपोगांडा : यात स्रोत स्पष्टपणे दर्शवून माहितीचा प्रसार करणे.
८ अ २. ‘ग्रे’ प्रोपोगांडा : माहितीचा स्रोत अस्पष्ट ठेवून प्रसार करणे.
८ अ ३. काळा प्रोपोगांडा : चुकीची माहिती पसरवून शत्रूला अपकीर्त करणे.
८ आ. खोट्या बातम्या (फेक न्यूज) : बनावट (खोट्या) बातम्या पसरवून लोकांना संभ्रमात टाकणे. यासह सोशल मिडियाचा व्यापक वापर करून ‘फेक न्यूज’चा प्रसार करणे.
८ इ. सायबर आक्रमणे :
८ इ १. संगणकीय प्रणाली आणि ‘नेटवर्क हॅक’ करून माहिती चोरून नेणे.
८ इ २. ‘सायबर स्पेस’मध्ये अफवा पसरवणे.
८ इ ३. ‘सायबर स्पेस’मध्ये अस्थिरता निर्माण करणे.
८ ई. सोशल इंजिनियरिंग :
८ ई १. लोकांची भावना आणि विश्वास यांचा लाभ घेऊन त्यांना फसवणे.
८ ई २. ‘फिशिंग’ (माहिती चोरण्याची एक पद्धत), ‘स्पीयर फिशिंग’ (विशिष्ट संस्थेतील संवदेनशील माहिती अनधिकृतरित्या मिळवण्याची पद्धत) आणि इतर तंत्रांचा वापर करून लोकांची माहिती चोरणे.
८ उ. डीप फेक (खोटी चित्रे) :
८ उ १. ‘व्हिडिओ’ (ध्वनीफीत) आणि ‘ऑडिओ (ध्वनीमुद्रित) क्लिप्स’मध्ये पालट करून लोकांना फसवणे.
८ उ २. राजकीय नेत्यांचे खोटे व्हिडिओ बनवून त्यांची प्रतिमा खराब करणे.

९. ‘कॉग्निटिव्ह युद्धा’चा सामना कसा करावा ?
९ अ. माहितीचा चिकित्सकपणे विचार करा : कोणत्याही माहितीला स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पहा.
९ आ. विभिन्न स्रोतांमधून माहिती घ्या : एकाच स्रोतावर अवलंबून राहू नका.
९ इ. सोशल मिडियाचा वापर काळजीपूर्वक करा :
९ इ १. खोट्या बातम्या पसरवणारी खाती आणि समूह यांना ‘फॉलो’ करू नका.
९ इ २. स्वतःचा संगणक आणि भ्रमणभाष संच यांची सुरक्षा करा.
९ इ ३. लोकांमध्ये माहितीची चिकित्सकपणे विचार करण्याची क्षमता विकसित करा.
१०. ‘कॉग्निटिव्ह युद्धा’चा सामना करण्यासाठी भारताने करावयाची उपाययोजना आणि कार्यवाही
१० अ. भारताने सत्य माहितीचा प्रसार करण्यावर भर द्यावा.
१० आ. सोशल मिडियावर खोट्या बातम्या रोखण्यासाठी कठोर नियम असावेत.
१० इ. भारताने स्वतःच्या सुरक्षायंत्रणांना ‘कॉग्निटिव्ह युद्धा’चा सामना करण्यासाठी प्रशिक्षित करावे.
१० ई. भारताने इतर देशांसह मिळून ‘कॉग्निटिव्ह युद्धा’चा सामना करण्यासाठी एकत्रितपणे काम करावे.
११. ‘कॉग्निटिव्ह युद्धा’पासून बचाव करण्याकरता काय करावे ?
भारताचे शत्रू ‘कॉग्निटिव्ह युद्धा’च्या तंत्राचा वापर करत आहेत. ‘कॉग्निटिव्ह युद्धा’चे विविध अंग वापरून भारताची आंतरिक सुरक्षा, सामाजिक एकता आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमा यांवर परिणाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या संदर्भात भारताने नेमके काय केले पाहिजे ? ते येथे देत आहे.
११ अ. खोटी माहिती, अफवा पसरवणे (Disinformation, Fake News) :
१. माध्यमांद्वारे आणि सोशल मिडियावर प्रभावी प्रचार मोहीम राबवून जनमत अन् विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
२. भारताच्या शत्रूदेशांद्वारे सोशल मिडियावर आणि ‘डिजिटल प्लॅटफॉर्म्स’वर खोटी माहिती अन् अफवा पसरवल्या जातात. यामध्ये धार्मिक, वांशिक आणि प्रादेशिक संघर्ष यांना प्रक्षुब्ध करून सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. भारतातील हिंसाचाराच्या घटनांचे विकृत स्वरूप दाखवून वातावरण तापवणे.
११ अ १. बचाव : वरील चुकीच्या गोष्टींपासून बचाव कसा करायचा, ते येथे देत आहे.
१. तथ्य पडताळणी यंत्रणा मजबूत हवी : सरकार आणि खासगी संस्था यांनी एकत्र येऊन तथ्य पडताळणी यंत्रणा मजबूत करावी. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर खोटी माहिती ओळखून ती लगेच दूर करण्यासाठी कडक उपाययोजना करायला हव्यात.
२. आपल्या महत्त्वाच्या सामरिक आणि युद्ध संबंधित माहितीचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत दक्ष रहा. शत्रूच्या आक्रमणांपासून माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करा.
३. जनतेला खोटी माहिती ओळखण्याविषयी आणि त्यापासून सावध रहाण्याविषयी जागरूक करणे आवश्यक आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये यांविषयीची शिकवण असावी.
११ अ. समाजात फूट पाडणे (Social Division and Polarization) : भारताच्या शत्रू देशांनी धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता वापरून देशातील समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः धार्मिक तणाव आणि जातीय संघर्ष वाढवण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्या जातात.
११ आ. बचाव :
११ आ १. सामाजिक एकता मजबूत करणे : सरकार आणि स्थानिक नेतृत्व यांनी एकत्र येऊन समाजातील सर्व घटकांमध्ये एकता वाढवण्यासाठी कार्य करायला हवे. विविधतेतून एकता हा भारताचा मुख्य आधार आहे आणि त्याला धोका पोचवणार्या घटकांना निष्प्रभ करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करायला हवेत.
११ आ २. सर्व धर्म आणि समुदाय यांना समान वागणूक देणारी धोरणे आखणे, जेणेकरून शत्रूला फूट पाडण्याची संधी मिळणार नाही.
११ इ. भारताच्या जागतिक प्रतिमेला तडा देणे (Harming India’s International Image) : शत्रू देश भारताच्या जागतिक प्रतिमेला धक्का देण्यासाठी खोटी माहिती पसरवतात. भारताच्या मानवाधिकारांविषयी चुकीच्या कथा आणि घटक यांची निर्मिती करून जागतिक स्तरावर भारताची अपर्कीती करण्याचा प्रयत्न केला जातो.
११ इ १. बचाव :
१. सक्रीय सार्वजनिक धोरणे : भारताने त्याच्या जागतिक प्रतिमेला कायम ठेवण्यासाठी जागतिक मंचांवर स्वतःची बाजू स्पष्टपणे मांडली पाहिजे. बाहेरच्या देशांमध्ये भारतीय दूतावासांना अधिक सक्रीय केले पाहिजे, जेणेकरून खोटी माहिती पसरवणार्यांना त्वरित प्रत्युत्तर दिले जाईल.
२. जागतिक मिडिया प्लॅटफॉर्म्सवरील उपस्थिती वाढवणे : भारताने स्वतःचे दृष्टीकोन आणि धोरणे स्पष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये अधिक सक्रीय भूमिका बजावली पाहिजे.
३. जागतिक समुदायाचे विचार आणि राजकीय दृष्टीकोन यांवर प्रभाव टाकण्यासाठी सार्वजनिक धोरणांच्या माध्यमातून कार्य करा. या प्रयत्नांमध्ये स्वतःची बाजू अधिक सकारात्मक दाखवायला हवी.
११ ई. सायबर आणि तंत्रज्ञान यांच्यावर आक्रमणे (Cyber Attacks and Technology Manipulation) : शत्रू देश भारताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांवर सायबर आक्रमणे करून महत्त्वाची माहिती चोरण्याचा आणि तिचा वापर करून भारताला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
११ ई १. बचाव :
१. सायबर सुरक्षा मजबूत करणे : भारताने त्याच्या सायबर संरचनेची सुरक्षा वाढवावी. सायबर आक्रमणांना रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि सायबर सुरक्षा तज्ञांचे एक प्रभावी पथक सिद्ध करावे.
२. सतत प्रशिक्षण देणे आणि अद्ययावत् (अपडेट्स) करणे : सरकारी आणि खासगी क्षेत्रांतील माहिती तंत्रज्ञान संबंधित कर्मचार्यांना सतत प्रशिक्षण देऊन त्यांना नव्याने होऊ शकणारी आक्रमणे आणि धोरणे यांविषयी अद्ययावत् ठेवणे आवश्यक आहे.
३. सायबर आक्रमणांद्वारे शत्रूच्या माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांवर आघात करा, ज्यामुळे त्यांच्या संगणकीय प्रणालींवर परिणाम होतो आणि शत्रूच्या निर्णय क्षमतेवर प्रभाव पडतो. उद्देश आहे की, शत्रूला माहितीच्या विषयांत संभ्रम निर्माण करणे.
११ उ. मनोवैज्ञानिक मोहिमा (ऑपरेशन्स) (Psychological Operations) : शत्रू सामान्य नागरिकांमध्ये मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी मनोवैज्ञानिक मोहिमांचा वापर करतो. याद्वारे तो जनतेला भयभीत करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास खालावण्याच्या प्रयत्नात असतो. प्रचार साहित्य, चित्रफिती आणि संदेश यांचा वापर करून मनःस्थितीवर आक्रमण केले जाते. शत्रू देश मनोवैज्ञानिक आक्रमणांचा वापर करून भारतीय सैनिक आणि जनता यांचे मनोधैर्य खालावण्यासाठी समाजातील लोकांमध्ये असंतोष पसरवण्यासाठी प्रयत्न करतात.
११ उ १. बचाव :
१. मनोबल वाढवणारी धोरणे : सरकार आणि लष्कर यांनी सैनिक अन् जनता यांचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी तणाव व्यवस्थापनाच्या आणि प्रेरणादायी कार्यक्रमांची कार्यवाही करावी.
२. माध्यमांवर कडक नियंत्रण : ज्या माध्यमांद्वारे मनोवैज्ञानिक आक्रमणे होतात, त्यावर नियंत्रण ठेवून त्यांना वेळीच प्रत्युत्तर देणे महत्त्वाचे आहे.
१२. निष्कर्ष
भारताच्या शत्रू देशांनी ‘कॉग्निटिव्ह युद्धा’च्या तंत्राचा वापर करून देशाच्या आंतरिक सुरक्षेला आणि एकतेला आव्हान दिले आहे. याला उत्तर देण्यासाठी भारताने एक व्यापक धोरण आखणे आवश्यक आहे, ज्यात सायबर सुरक्षा, माहिती व्यवस्थापन, जागरूकता आणि सामाजिक एकता यांवर भर दिला जाईल. यामध्ये धोरणांची कार्यवाही अधिक महत्वाची आहे. ‘कॉग्निटिव्ह युद्ध’ हे एक गंभीर धोका आहे. आपल्याला या युद्धाचा सामना करण्यासाठी सतर्क आणि सज्ज रहाणे आवश्यक आहे.
(समाप्त)
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (१४.१.२०२५)