रत्नागिरीत ७६ व्या प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन

पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन

रत्नागिरी – ‘धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर’मधून सैनिकांच्या हातातील बंदुकांची रत्नागिरीमध्ये निर्मिती होणार आहेत. विजेविषयी ग्रामपंचायतींना सक्षम करण्याचे काम राज्यात प्रथमच गोळप सौर प्रकल्पाने केले आहे. दुसरा प्रकल्प गुहागरमध्ये मूर्त स्वरूप घेत आहे. कशेळी हे संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहे, तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुढेही चालू रहाणार आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या वेळी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आणि अन्य अधिकारी यांसह विभागप्रमुख उपस्थित होते.

धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून बंदुकांची निर्मिती रत्नागिरीमध्ये होणार ! – पालकमंत्री उदय सामंत

पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले,  

१. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना चालू आर्थिक वर्षाचा रुपये ३६० कोटी इतका संमत अर्थसंकल्पीय नियतव्यय असून, जिल्ह्याच्या विकासावर तो १०० टक्के खर्च होईल. दावोस येथे १५ लाख ७० सहस्र कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यांपैकी ४० सहस्र कोटी रुपयांचे सामंजस्य करार रत्नागिरी शहरासाठी आहेत. त्यामुळे २५ ते ३० सहस्र युवक-युवतींना आता रोजगार उपलब्ध होणार आहे.

२. रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. तालुकाच्या ठिकाणी शिवसृष्टी ही संकल्पना महाराष्ट्रात प्रथम जिल्ह्यात उदयास आली. दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्यात यशस्वी झालो. जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केंद्र तयार होत आहे. याचा उपयोग देशातील आणि परदेशातील शिवप्रेमींना होणार आहे.

३. २०० कोटी रुपये खर्चून रत्नागिरीत झालेल्या टाटा कौशल्यवर्धन केंद्रातून ५ सहस्र विद्यार्थी पुढे येणार आहेत.

४. भविष्यामध्ये सैनिकांच्या हातातील बंदुकांचा कारखाना हा रत्नागिरीमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, त्यासाठी दावोस १६ सहस्र ५०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरसमवेत झाला आहे.

५. पुस्तकांचे गाव म्हणून मालगुंडला ओळखले जाईल, त्यासाठी सव्वा कोटी रुपये मराठी विभागाकडून दिले जातील.
पालकमंत्री सामंत यांनी कवायत निरीक्षण केले. यानंतर पोलीस पथक, महिला पोलीस पथक, गृहरक्षक दल, पोलीस बँडपथक, गृहरक्षक महिलापथक, एन्.सी.सी. स्काऊट गाईड, एन्.सी.सी. नेव्हल, नवोदय विद्यालय स्टुडन्ट पोलीस कॅडेट, विराट श्वान पथक, जलद प्रतिसाद पथक, अग्नीशामन दल, उमेद टुरिस्ट व्हॅन, प्राथमिक शिक्षक विभाग आदींनी संचलन करून मानवंदना दिली.