
संभल (उत्तरप्रदेश) – ध्येय साध्य करण्यासाठी, आम्हाला भजन गाण्याची संधी मिळाली आहे आणि तुम्हाला जिल्ह्याचे व्यवस्थापन करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे सेवा वेगवेगळ्या असल्या, तरी दोघांनाही समान बक्षीस मिळेल. तुम्हाला जिल्हाधिकारीपद मिळाले आहे; म्हणून जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि खर्या भावनेने नामजपासह सेवा केली, तर तुम्ही महात्मा आहात, महात्माची गती जितकी असेल तितकीच तुमचीही गती असेल, असा उपदेश वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराज यांनी येथील हिंदूंच्या प्राचीन तीर्थस्थळांचे पुनरुज्जीवन करण्याच्या मोहिमेमुळे चर्चेत आलेले जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पेन्सिया यांना केला. संत प्रेमानंद महाराज त्यांना कर्तव्यकर्माचे महत्त्व सांगतांनाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. संभलमधील ६८ तीर्थस्थळे आणि १९ प्राचीन विहिरी शोधण्यासाठी एक मोठी मोहीम चालू केली आहे. त्याचे नेतृत्व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पेन्सिया करत आहेत.
प्रत्येक सेवा भगवंताच्या कृपेने प्राप्त होत असल्याने क्षमतेनुसार देशाची सेवा करा !
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पेन्सिया यांनी वृंदावन येथे संत प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. तेव्हा महाराज त्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘प्रत्येक सेवा ही भगवंताच्या कृपेने प्राप्त होते, तेव्हा आपण ती करत राहिली पाहिजे. तुमच्या क्षमतेनुसार देशाची सेवा करा. तुमचे जीवन देवाचे स्मरण करण्यात घालवा; कारण जीवनाचे ध्येय देवाची प्राप्ती करणे आहे.’’
तुमच्या कर्तव्यात कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी घ्या !
संत प्रेमानंद महाराजांनी गीतेतील अर्जुनाचे उदाहरण देत सांगितले की, अर्जुन म्हणतो की, ‘संन्यास घेतल्यानंतर मी देवाची पूजा करेन’; पण देव त्यांना मनाई करतो आणि म्हणतो की, ‘या वेळी धर्मयुद्ध हे कर्तव्य आहे.’ म्हणून तुमचे कर्तव्य बजावतांना आणि नामजप करतांना, तुमच्या कर्तव्यात कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी घ्या. जसे की, मी माझ्या भजनात कोणतीही चूक होऊ देणार नाही, याची काळजी घेतो.’
प्रलोभनाला बळी न पडता कार्य केले, तर ती देवाची पूजा आणि देशाची सेवा होईल !
महाराज पुढे म्हणाले, ‘‘आपण ज्या पदावर आहात, तिथे प्रलोभनाला बळी पडून कोणतीही चूक करू नका. असे कार्य केले, तर ती देवाची पूजा होईल आणि देशाची सेवाही होईल. असे केल्याने आपण एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून गणले जाल आणि ती देवाची सेवाही मानली जाईल. कुणी देवाची सेवा करू शकला, तर मानवी जीवनाला अर्थ आहे; म्हणून आनंदाने जगा आणि कोणतेही व्यसन लावून घेऊ नका. उठता-बसता देवाचे नाव जपा.’’
संपादकीय भूमिका
|