S Jaishankar On Illegal Indian Immigrants : अमेरिकेत बेकायदेशीररित्या रहाणार्‍या भारतियांना परत घेण्यास सिद्ध !

  • परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी भारताची भूमिका केली स्पष्ट

  • अमेरिका बेकायदेशीररित्या रहाणार्‍या १८ सहस्र भारतियांना बाहेर काढणार

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ

वॉशिंग्टन (अमेरिका) – आमचे नागरिक येथे (अमेरिकेत) बेकायदेशीरपणे रहात असतील आणि ते आमचे नागरिक आहेत, याची निश्‍चिती झाली असेल, तर आम्ही त्यांना परत घेण्यासाठी सदैव सिद्ध आहोत, अशी भूमिका भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे एका पत्रकार परिषदेत मांडली. अमेरिकेत डॉनल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेत बेकायदेशीररित्या रहाणार्‍यांना हाकलण्याची घोषणा केली. सध्या अमेरिकेत १८ सहस्र भारतीय बेकायदेशीररित्या रहात असल्याचे म्हटले जात आहे. यावर परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडली. डॉ. जयशंकर यांनी याविषयी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली आहे. डॉ. जयशंकर ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थित रहाण्यासाठी आले होते. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक पत्रही ट्रम्प यांना सुपूर्द केले.

डॉ. जयशंकर म्हणाले की, भारत बेकायदेशीर स्थलांतराला तीव्र विरोध करतो. हे देशांच्या प्रतिमेसाठी चांगले नाही.

बांगलादेशाविषयी चर्चा

डॉ. जयशंकर म्हणाले की, त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्ज यांच्याशी बांगलादेशाच्या सूत्रावर थोडक्यात चर्चा केली. तसेच अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावासावर झालेल्या आक्रमणांविषयी कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, हे सूत्र मी या वेळी मांडले नाही; पण सॅन फ्रान्सिस्कोमधील आमच्या वाणिज्य दूतावासावर झालेले आक्रमण अतिशय गंभीर घटना आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. या प्रकरणात संबंधितांवर कार्यवाही व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिका त्याच्या देशात बेकायदेशीररित्या रहाणार्‍यांना बाहेर काढतो, तर भारत राजकीय स्वार्थासाठी बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या यांना सर्व प्रकारची कागदपत्रे, नोकरी, व्यवसाय, घरे देतो. इतकेच नाही, तर त्यांना गुन्हेगारी करण्यासही मोकळीक देतो !