|
श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे सनातन संस्था आयोजित धर्मशिक्षण प्रदर्शनाला कुंभपर्वातील श्रद्धाळू, भाविक, संत-महंत यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘अशा प्रकारचे प्रदर्शन आमच्या भागात लावावे’, अशी संत आणि अनेक जिज्ञासू यांनी मागणी केली आहे. प्रदर्शन पाहून सनातनच्या धर्मकार्यात सहभागी होण्याची सिद्धता अनेक जिज्ञासूंनी दर्शवली. ११ जानेवारीपासून या प्रदर्शनाला प्रारंभ झाला आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते २१ जानेवारीपर्यंत सहस्रो जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

आचारधर्म, साधना, तीर्थक्षेत्र महिमा, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य, विविध भाषांतील ग्रंथसंपदा, सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने या प्रदर्शनात आहेत. ‘सनातन धर्म म्हणजे काय ?’, ‘धार्मिक कृती श्रद्धेने आणि योग्य प्रकारे केली गेली, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक होतो !’, तसेच ‘भारत स्वाभाविक हिंदु राष्ट्र आहे’, आदी माहिती देणारे फलक या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत.
सनातनचे प्रदर्शन पहाणार्या जिज्ञासूंचे अभिप्राय असे…!
१. आचार्य डॉ. तन्मयानंद, ‘श्रीशक्तिन्यास’, ओडिशा : सनातन धर्म संस्कृतीचे शास्त्रीय परिभाषेतील प्रस्तुतीचे हे प्रदर्शन सनातन धर्मासाठी सुरक्षाकवच प्रदान करत आहे. आमच्या ओडिशातील आश्रमात याविषयी शिबिर आयोजित करू शकतो. आमच्या भागातील धर्मांतराच्या समस्यांच्या विरुद्ध आपण एकत्र कार्य करू शकतो.
२. श्री. विशाल दुबे, नवीन झुसी, प्रयागराज, उत्तरप्रदेश : मी हे प्रदर्शन पाहिल्यावर पुष्कळ प्रभावित झालो आहे. यात पुष्कळ छान माहिती आहे. मी स्वतः एक सनातनी असून आपल्या कार्यात सहभागी होऊ इच्छितो.
३. श्री. दिवाकर पांडेय, वाराणसी, उत्तरप्रदेश : हिंदूंना जागृत करण्यासाठी आवश्यक असलेले असे हे प्रदर्शन पाहिल्यावर मी आश्चर्यचकित झालो आहे. मी आपल्या कार्यात सहभागी होऊ इच्छितो.
४. श्री आनंद महाराज हाळे, शिवभक्ती पारायण, नांदेड, महाराष्ट्र : सनातन संस्थेची ग्रंथसंपदा सर्वसामान्यांसाठी अत्यावश्यक आहे. हे ग्रंथ तळागळापर्यंत, तसेच प्रत्येक तालुक्यात पोचायला हवेत.