अमेरिकेचा ‘ग्रँड’ (भव्य) विस्तारतावाद !

आज अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डॉनल्ड ट्रम्प पदभार स्वीकारणार, त्या निमित्ताने…

अमेरिकेचे नूतन राष्‍ट्राध्‍यक्ष डॉनल्‍ड ट्रम्‍प

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून आज (२० जानेवारीला) डॉनल्ड ट्रम्प सत्तापदाची सूत्रे हाती घेणार आहेत. तथापि नोव्हेंबर २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल घोषित झाल्यापासून ट्रम्प यांनी अमेरिकेतील आगामी काळातील धोरणे कशा स्वरूपाची असतील, याविषयीची रूपरेषा स्पष्ट करण्यास प्रारंभ केला आहे. ती करत असतांना त्यांनी धक्कातंत्राचा अवलंब केल्याचे दिसत आहे. मुळातच डॉनल्ड ट्रम्प यांचे व्यक्तीमत्त्व हे काहीसे विक्षिप्त स्वरूपाचे आहे, असे त्यांचे निकटवर्तीयही सांगतात. वर्ष २०१६ ते २०२० या ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळातील त्यांची भाषणे, या भाषणांमधील त्यांचे हावभाव आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली विधाने अन् घेतलेले निर्णय या सर्वांचा मतितार्थ काढल्यास जगाला अनपेक्षित असणारे, धक्का देणारे, परंपरा मोडित काढणारे निर्णय घेण्याकडे त्यांचा कल राहिला आहे.

मागील निवडणुकीमध्ये त्यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ (अमेरिका प्रथम), अशी घोषणा दिली होती, तर या वेळच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी याला ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (अमेरिकेला पुन्हा महान बनवूया !) या घोषणेची जोड दिली. नोव्हेंबर २०२४ पासून ते आतापर्यंतची त्यांची स्फोटक वक्तव्ये पाहिल्यास त्यात एक सुनियोजित रणनीती दिसून येते आणि ती त्यांच्या घोषणेशी सुसंगत आहे. अमेरिकन लोकांसह जगभरातील अभ्यासकांना त्यांच्या या स्फोटक वक्तव्यांमधील सातत्य बुचकळ्यात टाकत आहे. त्यामुळे २० जानेवारी या दिवशी ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जागतिक राजकारणाचे रंग कसे असतील किंवा जागतिक राजकारणाला वा अर्थकारणाला कोणती दिशा मिळेल, यांविषयी थोडे चिंतेचे आणि असुरक्षिततेचे वातावरण आहे.

लेखक : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे. (१२.१.२०२५)

१. ट्रम्प यांचे ‘ग्रँड अमेरिका’चे (भव्य अमेरिकेचे) एक स्वप्न

ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा कल हा काहीसा अलिप्ततावादाचा होता. जागतिक राजकारणातील अमेरिकेचा हस्तक्षेप न्यून करणे, संघर्षाची किंवा युद्धाची भाषा न करणे यांवर ट्रम्प यांचा भर राहिला. त्यामुळेच बर्‍याच क्षेत्रांमधून अमेरिकेची सहभागात्मक गुंतवणूक त्यांनी काढून घेतली होती. ट्रम्प यांच्या कार्यकाळात इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष चिघळलेला नव्हता, रशिया-युक्रेन यांच्यातील तणाव वाढलेला नव्हता. त्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात ट्रम्प यांना यश आले होते; परंतु वर्ष २०२५ ते २०२८ या ट्रम्प यांच्या दुसर्‍या कार्यकाळात अमेरिकेचे परराष्ट्र धोरण हे अनेक स्फोटक गोष्टींनी भरलेले असेल, अशा स्वरूपाचे संकेत मिळायला प्रारंभ झाला आहे. त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वीच ‘ग्रँड अमेरिका ड्रीम’चे (भव्य अमेरिकेचे स्वप्न) जनतेपुढे मांडले आहे.

२. ‘ग्रँड अमेरिकन ड्रीम’चे धक्कादायक प्रारूप 

निवडणुकीच्या काळात अमेरिकेचे जागतिक राजकारणात काहीसे डळमळीत झालेले स्थान सावरून पुन्हा अमेरिकेला सशक्त बनवण्याचे त्यांनी दाखवलेले स्वप्न मतदारांना आकर्षित करणारे ठरले आणि या सोनेरी स्वप्नावर विश्वास ठेवून अमेरिकन मतदारांनी त्यांना भरभरून मतदान केले; परंतु आता त्यांच्याकडून ज्या ‘ग्रँड अमेरिकन ड्रीम’चे प्रारूप मांडले जात आहे, ते धक्कादायक आहे; कारण ते अमेरिकेच्या विस्ताराचे आहे. यासाठी त्यांनी अलीकडेच एक नकाशा (मानचित्र) घोषित केला आहे. त्यानुसार ट्रम्प यांचे लक्ष प्रामुख्याने कॅनडा, ग्रीनलँड आणि पनामा कालवा या ३ क्षेत्रांवर आहे. यापैकी ग्रीनलँड हे जगातील सर्वांत मोठे बेट असून ते रशिया आणि अमेरिका यांच्या मध्यभागी आहे. हे ग्रीनलँड बेट विकत घेण्याची भाषा ट्रम्प यांनी केली आहे.

दुसरीकडे अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यातील दुवा असणार्‍या किंवा अमेरिकेच्या व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार्‍या पनामा कालव्यावर पुन्हा एकदा अमेरिकेचा सार्वभौम अधिकार प्रस्थापित करण्याचा इरादा ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. याखेरीज डिसेंबर मासापासून त्यांनी स्वतःची तिसरी खेळी खेळली असून यामध्ये कॅनडा या देशाचे अमेरिकेशी एकीकरण करण्याचा दृढनिश्चय ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

ट्रम्प यांचा हा तिसरा बाण जगासाठी केवळ धक्कादायकच नव्हे, तर प्रचंड चिंता वाढवणारा ठरला आहे. ‘अमेरिकेचे ५१ वे राज्य’ म्हणून कॅनडाचा उल्लेख ट्रम्प यांनी केला आहे. कॅनडाचे मावळते पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा उल्लेख त्यांनी ‘गव्हर्नर’ (राज्यपाल) असा केला आहे.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

३. ट्रम्प यांची वक्तव्ये म्हणजे सुनियोजित रणनीतीचा भाग ! 

प्रारंभीला लोकांना असे वाटले होते की, ट्रम्प यांना वायफळ बडबड आणि स्फोटक वक्तव्ये करण्याची सवय असून आताची वक्तव्येही त्याच धाटणीची आहेत; मात्र कॅनडाविषयी ट्रम्प सातत्याने बोलत आहेत. अलीकडेच जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिले. यानंतर ट्रम्प यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट अपलोड केली. त्यामध्ये ‘कॅनडाच्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यामध्ये आलेल्या अपयशामुळे ट्रुडो यांना त्यागपत्र द्यावे लागले आहे’, असे म्हटले, तसेच ‘कॅनडाचे आर्थिक प्रश्न गंभीर स्वरूपाचे असून त्यावरचा उपाय कॅनडाचे अमेरिकशी एकीकरण करणे हा आहे’, असेही ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर ‘कॅनडामधील जनतेला अमेरिकेसह एकीकरण हवे आहे’, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.

ट्रम्प यांनी सलग ३ वेळा एकीकरणाचे हे सूत्र मांडल्यामुळे केवळ कॅनडाच नव्हे, तर अन्यही अनेक देशांमध्ये कमालीची असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यासह ट्रम्प यांनी हमासविरुद्ध मोठ्या संघर्षाचेही संकेत दिले आहेत. ‘२० जानेवारी या दिवशी मी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी अमेरिकेचे जे नागरिक ओलिस ठेवले आहेत, त्यांची मुक्तता केली नाही, तर संपूर्ण पश्चिम आशियामध्ये हिंसाचाराची त्सुनामी येईल’, असा सज्जड दम त्यांनी हमासला भरला आहे. या सर्व वक्तव्यांचे सार असे की, ट्रम्प हे एका विशिष्ट धोरणानुसार पुढे जात आहेत. त्यांची वक्तव्ये भलेही स्फोटक असली, तरी ती बिनबुडाची नसून ती एका सुनियोजित रणनीतीचा भाग आहेत.

४. कॅनडाची अमेरिकेशी एकीकरण करण्यामागील कारणमीमांसा

कॅनडासंदर्भात ट्रम्प यांच्या विधानांमागे निर्वासितांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ट्रम्प हे निर्वासितांच्या सूत्रांविषयी कमालीचे संवेदनशील आहेत आणि यंदाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी हे सूत्र प्रकर्षाने मांडलेही आणि त्यावर मोठ्या प्रमाणावर मतदानही झाले. विशेषतः अमेरिकेच्या दक्षिणेकडच्या, त्यातही मेक्सिकोशी संलग्न असणार्‍या सीमांवरून मोठ्या प्रमाणावर निर्वासित अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे येत असतात. या निर्वासितांमुळे अमेरिकेची मोठी हानी होत आहे, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी मेक्सिकोच्या सीमेवर एक ‘ग्रेट वॉल’, म्हणजेच भव्य भिंत बांधण्याची योजनाही आखली होती. या वेळी त्यांनी उत्तरेकडेही स्वतःचा मोर्चा वळवला आहे. ‘कॅनडाशी संलग्न असणारी सीमाही संवेदनशील असून तेथूनही मोठ्या प्रमाणावर निर्वासित अमेरिकेत येतात’, असा दावा करून त्यांनी या देशाच्या एकीकरणाचे सूत्र मांडले आहे.

कॅनडामध्ये जाऊन तेथे स्थायिक होणे, हे तुलनेने बरेच सोपे आहे; कारण राजाश्रय मिळवण्यासंदर्भातील कॅनडाचे नियम हे पुष्कळच शिथिल आणि लवचिक आहेत. त्यामुळेच कॅनडा हा निर्वासितांचे स्वर्गस्थान बनत चालला आहे. आज जगभरातून असंख्य निर्वासित कॅनडामध्ये भरती होतांना दिसतात. कॅनडाचे क्षेत्रफळ प्रचंड मोठे असून लोकसंख्या पुष्कळ अल्प आहे. त्यामुळे कॅनडाकडे पुष्कळ लोकांचा ओढा आहे. भारतातील शीख समुदायातील अनेक लोक कॅनडामध्ये वास्तव्यास आहेत. महत्त्वाचे म्हणजे यापैकी बहुसंख्य निर्वासितांना कॅनडामध्ये वास्तव्य करायचे नसून त्यांना तेथून अमेरिकेमध्ये यायचे आहे. यासाठी कॅनडाचा वापर एखाद्या ‘बफर झोन’प्रमाणे (तटस्थ क्षेत्राप्रमाणे) केला जात आहे. ते कॅनडामध्ये येऊन आणि स्थायिक होऊन बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसखोरी करतात.

अलीकडील काळात मेक्सिकोमधून होणार्‍या घुसखोरीपेक्षा कॅनडाच्या माध्यमातून अमेरिकेत होणारी घुसखोरी कमालीची वाढली आहे. दुसरे म्हणजे गेल्या काही वर्षांत कॅनडात आतंकवादी, खलिस्तानी कारवाया वाढत असून तेथे अनेक आतंकवादी आश्रय घेत आहेत. यामुळे अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेला धोका आहे. तो टाळण्यासाठी ट्रम्प यांना कॅनडाचे एकीकरण करायचे आहे. कॅनडामध्ये अमेरिकन नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक झालेले आहेत, हेही यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे.

५. अमेरिकेने ‘ग्रीनलँड’वर आधिपत्य मिळवण्यामागील कारण

‘ग्रीनलँड’चा विचार करता नैसर्गिक वायू, तेलासह अनेक दुर्मिळ खजिनांचे मोठे साठे आहेत. त्यावर आधिपत्य मिळवून अमेरिकेचा ऊर्जासुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासह यासाठीचे अन्य देशांवरील अवलंबित्व न्यून करण्याचा ट्रम्प यांचा मानस आहे. ग्रीनलँड विकत घेतल्यास अमेरिका रशियाच्या दाराशी जाऊन पोचणार आहे. यासाठी ट्रम्प यांनी आपल्या मुलाला चाचपणीसाठी ग्रीनलँडला पाठवले आहे.

६. ट्रम्प यांचा विस्तारवादी साम्राज्यवाद लोकशाहीच्या संकल्पनांशी विसंगत !

ट्रम्प यांच्या ‘ग्रँड स्ट्रॅटेजी’ला (भव्यतेच्या धोरणाला) यश येते का ? हे येणार्‍या काळात पहावे लागेल. विशेष म्हणजे ट्रम्प यांना या सर्व भूमिकांमध्ये जगप्रसिद्ध अब्जाधीश इलॉन मस्क याची साथ आहे. अलीकडील काळात मस्क यांनीही युरोपियन देशांविषयी कमालीची स्फोटक वतव्ये करण्यास प्रारंभ केला केली आहे. युरोपातील अतीउजव्या विचारसरणीच्या लोकांना मस्क समर्थन देत आहेत. इंग्लंड, जर्मन, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या देशांमधील राजकारणाविषयी मस्क बोलत आहेत. एक प्रकारे मस्क हे ट्रम्प यांच्या ‘ग्रँड स्ट्रॅटेजी’तील जणू भागीदारच बनले आहेत. त्यामुळेच जगाची चिंता आणखी वाढली आहे.

ट्रम्प यांनी केलेली विधाने प्रत्यक्षात उतरवल्यास जगाच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळेल; परंतु त्यासह हेही लक्षात घ्यायला हवे की, आज ज्या व्लादिमिर पुतिन यांच्या (रशियाचे राष्ट्राध्यक्ष) रशियन विस्तारवादावर किंवा शी जिनपिंग यांच्या चिनी विस्तारवादावर अमेरिका आक्षेप घेत आहे, त्याच दिशेने ट्रम्पही आता निघाले आहेत. आधुनिक काळातील अमेरिकेचा हा विस्तारवादी साम्राज्यवाद लोकशाहीच्या संकल्पनांशी विसंगत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. एखादी वस्तू विकत घेतल्याप्रमाणे देश विकत घेण्याची भाषा करणे, हा त्या देशाच्या सार्वभौमत्वावरचा घाला आहे. अर्थात् अमेरिका इतिहास काळापासून अशा प्रकारचे हस्तक्षेपवादी राजकारण करत असून ट्रम्प हीच भूमिका आता ‘ग्रँड’ पद्धतीने पुढे नेत आहेत.

(साभार : डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे फेसबुक आणि दैनिक ‘सकाळ’)