प्रयागराज कुंभपर्व २०२५
आजपासून प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे महाकुंभमेळा चालू होत आहे. त्या निमित्ताने…
आखाडे हे महाकुंभमेळ्यातील मुख्य आकर्षण आहेत. यातील आवाहन आखाड्याविषयी माहिती आपण समजून घेऊ. आखाड्यांमध्ये कुस्तीचा आखाडा आपल्याला माहिती आहे; पण साधूंचे हे आखाडे, म्हणजे हिंदु धर्माचे म्हणजेच सनातन धर्माचे रक्षण करणार्या लढवय्या साधूंची एक सेनाच असते.
१. आखाड्यांची निर्मिती
हिंदु धर्म तत्कालीन विविध विचारसरणींच्या अथवा तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने झाकोळला जात होता, तसेच त्याच्या अनुयायांची दिशाभूल होत होती. भविष्यात हिंदु धर्मावर वाढत्या संकटांचा विचार करून आद्यशंकराचार्यांनी भारताच्या ४ दिशेला ४ पिठांची स्थापना केली. या पिठांच्या अंतर्गत जे साधू एकत्र येतील, त्यांना शास्त्रासह शस्त्र चालवण्याचेही ज्ञान असले पाहिजे. त्यामुळे आखाड्यांची निर्मिती झाली. प्रमुख आखाडे प्रथम ४ होते; मात्र त्यांच्यातील उपासनापद्धत, नियम यांवरून वादाचे प्रसंग घडले. त्यामुळे या ४ आखाड्यांचे आखाडे वाढत जाऊन ते सध्या १३ आखाडे झाले आहेत. यामध्ये ७ आखाडे हे शैव पंथीय आहेत, ३ वैष्णव पंथीय आणि ३ हे उदासीन संप्रदायाचे आहेत. काही आखाड्यांची निर्मिती मात्र ८ व्या शतकापूर्वीच झाली, फक्त त्यांचे नामाभिधान नंतर झाले, असे आखाड्यांचे म्हणणे असते.

या संप्रदायातील आवाहन आखाड्याला ‘आद्य आखाडा’ म्हणतात. आवाहन आखाड्याला महाकुंभाचा राजा असे म्हटले जाते. हा पुष्कळ जुना आखाडा आहे. प्रत्येक आखाड्याचा एक ध्वज असतो. या ध्वजाचा अर्थ ‘आखाडा निरंतर गतीशील आहे’, असा आहे. ‘आवाहन आखाड्याची स्थापना वर्ष ६ व्या शतकामध्ये झाली. सध्या त्यामध्ये ५२ सहस्र साधू आहेत’, असे आखाडा प्रमुखांचे म्हणणे आहे.
२. आखाड्यांच्या धर्मध्वज पूजनाने कुंभमेळ्यास प्रारंभ !
आखाड्याचा धर्मध्वज असतो, त्यामध्ये ५२ बंध अनिवार्य असतात. आद्यशंकराचार्य यांचा पहिला आखाडा आवाहन आखाडाच आहे. आखाड्यांच्या धर्मध्वज पूजनाने कुंभमेळ्याचा प्रारंभ होतो. आखाड्यांतील साधू जेव्हा आखाड्याच्या क्षेत्रात वाजत-गाजत मिरवणुकीतून चालत, हत्ती, घोडे यांवर बसून प्रवेश करतात, त्याला ‘पेशवाई’ मिरवणूक म्हणतात. ही पेशवाई मिरवणूक कुंभमेळ्याचे आकर्षण असते. या वेळी विविध आखाड्यांतील साधू त्यांच्या आखाड्यात परंपरेने असलेल्या शस्त्रांचे प्रदर्शन करतात. काही साधू या शस्त्रांचे प्रात्यक्षिक करतात. नागा साधू हे शंकराचार्यांचे लढवय्या दल असल्याने त्यांच्याकडे तलवार, भाला, दांडपट्टा अशी पारंपरिक शस्त्रास्त्रे असतात.
३. आखाड्यातील अखंड धुनी !
आवाहन आखाड्यात एक अखंड धुनी पेटती आहे. ही धुनी १ सहस्र ५०० वर्षांपासून पेटत आहे. या धुनीची पूजा केली जाते. या धुनीला ‘सनातन परंपरेची चेतना’ म्हणतात, त्यामुळे या धुनीला विझू देत नाहीत. कुंभमेळ्यात आखाड्यांमध्ये पूर्वापार अग्निमंत्र म्हणून अग्नी प्रज्वलित केला जायचा, आता अरणी मंथाने आग पेटवतात.
४. भस्म हेच साधूंचे वस्त्र
प्रयागराज येथे कुंभमेळ्याच्या कालावधीत पुष्कळ थंडी असते. सर्वसामान्यांना त्या थंडीपासून स्वत:चे रक्षण होण्यासाठी कपडे, स्वेटर यांचे थर चढवावे लागतात. नागा साधू वस्त्र घालत नाहीत. त्यांचे भस्म हेच वस्र आहे. या आवाहन आखाड्यात अनेक सिद्ध, योगी आहेत. त्यांपैकी काहींचा पेहराव, उपासनापद्धतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका साधूंनी सव्वा २ लाख रुद्राक्ष डोक्यावर धारण केले आहेत. त्या रुद्राक्षांचे एकूण वजन ४५ किलो आहे. हे साधू ४५ किलोचे रुद्राक्ष धारण करून काही घंटे उभे राहून उपासना करतात.
५. आखाड्यांचे स्वातंत्र्यलढ्यात आणि मोगलकाळात योगदान
कुंभमेळ्याच्या कालावधीत आखाड्यांतील दिसणारे हे साधू एरव्ही घनदाट जंगलात तपश्चर्या, साधना करतात, तसेच सर्वसामान्य वस्तीपासून, मानवी वावरापासून दूर रहाणे पसंत करतात. त्यामुळे हे साधू एरव्ही कुठे दिसत नाहीत. या आखाड्याने त्यांची शस्त्रास्त्रे सांभाळून ठेवली आहेत. लेखात सांगितल्याप्रमाणे देश आणि सनातन धर्मरक्षण हे आखाड्यांचे मुख्य कार्य आहे. आवाहन आखाड्याने वर्ष १८५७ च्या इंग्रजांविरुद्धच्या उठावाच्या वेळी राणी लक्ष्मीबाईंच्या बाजूने इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध केले. या आखाड्यातील ४० सहस्र साधू तेव्हा हुतात्मा झाले होते. महाराणी लक्ष्मीबाईंचा राजतिलक याच आखाड्याने केला होता. आखाड्यांना असे धर्मरक्षणाचे कार्य करावे लागते. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण कठीण असते. मोगल साम्राज्यात त्यांनी मोगलांविरुद्ध युद्ध केले, तेव्हाही अनेकांनी बलीदाने दिली आहेत. ‘धर्मरक्षणासाठी बलीदान करणे, धर्मरक्षण करण्यासाठी बलीदान करणे, हा समाजासाठी सर्वाेच्च त्याग आहे’, असे आवाहन आखाड्याचे साधू मानतात.
हिंदु धर्मासाठी शेकडो वर्षांपासून कार्यरत या आखाड्याप्रती कोटीश: कृतज्ञता !
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, कुंभनगरी प्रयागराज, उत्तरप्रदेश. (५.१.२०२५)