विमानतळावर अवैध औषधे आणि सिगारेट जप्त !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लंडनला बेकायदेशीररित्या पाठवल्या जाणार्या ७४ सहस्र औषधांच्या गोळ्या (२९.६ किलोग्रॅम) आणि २ लाख ४४ सहस्र ४०० बनावट सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्वांचे मूल्य ७५ लाख रुपये आहे. हा माल अन्नपदार्थांमध्ये लपवून लंडनला पाठवण्यात येत होता. अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाने ही कारवाई केली.
कल्याण-डोंबिवली येथे अतीवेगाने दुचाकी चालवणार्यांवर कारवाई !
कल्याण – कल्याण-डोंबिवली शहरांत अतीवेगाने दुचाकी चालवणार्या, दुचाकीवर ३ – ४ जण बसून प्रवास करणार्या १५० हून अधिक तरुणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. रात्री १० पासून ते मध्यरात्रीपर्यंत दुचाकीस्वारांकडून असे प्रकार केले जातात. अशांवर लक्ष ठेवून पोलिसांनी कारवाई केली.
५ दुचाकीस्वार तेलावरून घसरून पडले !
ठाणे – येथील नौपाडा भागात ६ जानेवारी या दिवशी पहाटे रस्त्यावर तेल सांडले होते. त्यावरून ५ दुचाकीस्वार घसरून पडले. या अपघातात कुणीही घायाळ झालेले नाही. नागरिकांनी तेल सांडल्याची माहिती दिल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी तेलावर माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
ठाणे येथे इमारतीत आग !
ठाणे – येथील बाळकुम भागातील ६ मजली इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील एका खोलीत ५ जानेवारीला रात्री आग लागली. आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी जाऊन इमारतीतील ३५ ते ४० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे जीवितहानी टळली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुंबई ते नागपूर ८ घंट्यांचा प्रवास !
मुंबई – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. इगतपुरी ते मुंबई असा ७६ किलोमीटरचा शेवटचा टप्पा सिद्ध झाला असून तो मार्च २०२५ च्या मध्यापर्यंत जनतेसाठी खुला केला जाईल. त्यामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर ८ घंट्यांत पार करता येईल.