धारगळ येथील ‘सनबर्न’मध्ये मृत्यू पावलेला करण कश्यप हा आय.आय.टी.चा हुशार विद्यार्थी

(आय.आय.टी. – भारतीय तंत्रज्ञान संस्था)

पणजी, ३० डिसेंबर (वार्ता.) – धारगळ येथे चालू असलेल्या ‘सनबर्न’ या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेला देहली येथील करण कश्यप हा युवक कार्यक्रमाच्या कालावधीत बेशुद्ध पडल्यानंतर उपचारार्थ म्हापसा येथील खासगी रुग्णालयात भरती केल्यानंतर त्याचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर करण कश्यप याचे वडील आणि बहीण २९ डिसेंबर २०२४ या दिवशी गोव्यात आले. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार करण कश्यप हा आय.आय.टी. कानपूरचा हुशार (टॉपर) विद्यार्थी होता आणि पुढील शिक्षणासाठी ‘कॅलिफोर्निया (अमेरिका) विद्यापिठा’ त जाणार होता. त्याच्या दुर्दैवी मृत्यूविषयी त्याचे वडील आणि बहीण शोक करत आहेत.

शवविच्छेदन अहवालात मूत्रपिंडाला इजा झाल्याचे निरीक्षण

करण कश्यप यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात मूत्रपिंडाला हानी झाल्याचे निदर्शनास आले आहे; मात्र व्हिसेरा (शरिरातील अंतर्गत अवयव) तपासणी प्रलंबित असल्याने मृत्यूच्या कारणावरील निवेदन राखून ठेवण्यात आले आहे. अहवालानुसार व्हिसेराच्या रासायनिक विश्लेषणानंतरच मृत्यूचे कारण समजू शकते.