पिलीभीत (उत्तरप्रदेश) येथे ३ खलिस्तानी आतंकवादी ठार

तिघांचे संबंध पाकिस्तान, ग्रीस आणि ब्रिटन देशांतील साथीदारांशी असल्याचे उघड

ठार करण्यात आलेले खलिस्तानी आतंकवादी

पिलीभीत (उत्तरप्रदेश) – येथे २३ डिसेंबरच्या पहाटे झालेल्या चकमकीत उत्तरप्रदेश आणि पंजाब पोलीस यांनी ३ खलिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले, तर २ पोलीस घायाळ झाले. हे तिन्ही आतंकवादी ‘खलिस्तान झिंदाबाद फोर्स’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचे होते. गुरविंदर सिंह, वीरेंद्र सिंह उपाख्य रवि आणि जसप्रीत सिंह उपाख्य प्रताप सिंह अशी त्यांनी नावे आहेत. हे तिघेही पंजाबच्या गुरुदासपूरचे रहिवासी होते. या आतंकवाद्यांनीच १९ डिसेंबर या दिवशी गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलीस चौकीवर ग्रेनेडने (हातबाँबने) आक्रमण केले होते. या आतंकवाद्यांकडून २ एके-४७ रायफली, २ पिस्तुले आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच चोरीची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. पुरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही चोरी झाली होती. या आतंकवाद्यांचे पाकिस्तानातील त्यांच्या संघटनेच्या रणजीत सिंह नीता या प्रमुखाशी संबंध होते. तसेच ग्रीस आणि ब्रिटन येथील त्यांच्या सहकार्‍यांशीही त्यांचे संबंध होते. ब्रिटनमधील एक शीख सैनिक या संघटनेशी संबंधित आहे.