Pakistan : पाकिस्तानी सैन्य देणार बांगलादेशाच्या सैन्याला प्रशिक्षण

पुढील वर्षी फेब्रुवारीपासून चालू होणार प्रशिक्षण

पाकिस्तान आणि बांगलादेशचे पंतप्रधान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – बांगलादेशाच्या सैन्याला आता पाकिस्तानच्या सैन्याकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पाक सैन्याच्या मेजर जनरल दर्जाच्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली एक पथक हे प्रशिक्षण देणार आहे. फेब्रुवारीपासून पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण बांगलादेशातील मेमनशाही छावणीत ‘आर्मी ट्रेनिंग अँड डॉक्ट्रिन कमांड’ या मुख्यालयात होणार आहे. हा टप्पा जवळपास वर्षभर चालणार आहे. यानंतर बांगलादेशी सैन्याच्या सर्व १० कमांडमध्येही पाक सैन्याकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

बांगलादेशाने पाककडून मागवला शस्त्रसाठा

बांगलादेशाने सप्टेंबर ते डिसेंबर या काळात पाककडून दारूगोळा मागवला. यात रणगाड्यांसाठीचे तोफगोळे, ४० टन आर्.डी.एक्स. आदींचा समावेश आहे.

बांगलादेशाचे नौदल पाक सैन्यासमवेत युद्धसराव करणार

दुसरीकडे बांगलादेशाचे नौदल पाकिस्तानसमवेत फेब्रुवारी महिन्यात कराची बंदरावर युद्धसराव करणार आहे. याला ‘अमन-२०२५’ असे नाव देण्यात आले आहे. पाकिस्तानकडून प्रत्येक २ वर्षांत होणार्‍या या युद्धसरावात बांगलादेश १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच सहभागी होत आहे.

भारतासाठी धोकादायक

पाक आणि बांगलादेश यांच्या सैनिकी युतीमुळे बंगालमधील सिलिगुडीत असणार्‍या ६० कि.मी. रुंद ‘चिकन नेक कॉरिडॉर’ला (कोंबडीच्या मानेप्रमाणे दिसणारा मार्ग) धोका निर्माण होऊ शकतो. हा कॉरिडॉर भारताच्या मुख्य भूमीला संपूर्ण ईशान्य भारताशी जोडतो. पाकिस्तानमुळे बांगलादेशात ईशान्येतील कट्टरतावादी गटांचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे. या कॉरिडॉरजवळ भूतानचे डोकलामही आहे. यावर चीनला नियंत्रण मिळवायचे आहे. बांगलादेशात युनूस सरकार आणि आता पाक सैन्याच्या प्रवेशानंतर चीनसाठी ही अनुकूल स्थिती आहे, असे भारतीय संरक्षणतज्ञांचे मत आहे.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेश प्रतिदिन हिंदु आणि भारत विरोधी कृत्य करत असतांना भारताने अद्यापही त्याकडे पहात रहाण्यापलिकडे काही न करणे चिंतेची गोष्ट आहे, असेच राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांना वाटत आहे !
  • स्वार्थांध अमेरिका जगभरातील भूराजकीय समीकरणे स्वत:च्या हितामध्ये आणण्यासाठी प्रयत्नरत राहिली आहे. आता विकसित होत चाललेल्या भारताला शह देण्यासाठी बांगलादेश अस्थिर करण्यासह पाकिस्तान, चीन यांच्याशी त्याची निकटता वाढवण्यामागे अमेरिका असण्याची शक्यता त्यामुळेच दाट आहे. पाककडून बांगलादेशाला हे प्रशिक्षण दिले जाणे, हा या व्यापक कटाचा भाग असू शकतो, हे लक्षात घ्या !