मुख्यमंत्र्यांकडून मंत्रीमंडळ फेरबदलावर शिक्कामोर्तब, तर नेतृत्व पालटण्याची आवश्यकता नसल्याचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सरकारी नोकरभरती ‘कर्मचारी भरती आयोगा’च्या माध्यमातूनच करण्यात यावी’, असे धोरण आहे. या धोरणानुसारच गोव्यातही ‘कर्मचारी भरती आयोग’ स्थापन करण्यात आला आहे. यामुळे सरकारी नोकर्यांमध्ये पारदर्शकता आली आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. तसेच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या वेळी राज्यात नेतृत्व पालटाची आवश्यकता नसल्याचे आणि तशी कोणतीही परिस्थिती उद्भवलेली नसल्याचे सांगितली.
मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘यापूर्वी सरकारी नोकर्यांसाठी मंत्री, आमदार यांच्यापर्यंत जावे लागत होते आणि यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होत होता. यापुढेही कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातून नोकरभरती करण्यात येणार आहे. हा आयोग बंद होणार नाही. कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातून परीक्षा दिल्याच्या दुसर्या दिवशी निकाल येतो आणि नोकरी मिळते, हे गोमंतकियांनी अनुभवलेले आहे’’.
नोकरी विक्री घोटाळ्यातील कुणालाही सोडणार नाही !
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘नोकर्यांचा घोटाळा मीच उघडकीस आणला. यासंबंधी पहिली तक्रार मी नोंदवली आहे. यासंबंधी तक्रार करण्यासाठी जनतेने पुढे यावे. तक्रारीत राजकारणी किंवा अन्य कुणाचेही नाव आल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि या प्रकरणात अडकलेल्यांना आम्ही सोडणार नाही. नोकरी विक्री घोटाळ्याच्या प्रकरणी माझ्या पत्नीवर बिनबुडाचे आरोप करण्यात आले. हे आरोप करणार्यांना मी अजिबात सोडणार नाही. संबंधितांच्या विरोधात मानहानीचे दावे प्रविष्ट (दाखल) करण्यात येणार आहेत.’’
मंत्रीमंडळ फेरबदल नक्कीच होणार !
मंत्रीमंडळात फेरबदल होणार, हे निश्चित आहे; मात्र ते कधी होणार ? हे सध्या सांगू शकत नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पसार झालेला आरोपी सिद्दीकी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात सापडणार !
पोलीस कोठडीतून पलायन केलेला भूमी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी खान उपाख्य सुलेमान याच्याविषयी बोलतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याची प्रकरणे उघडकीस आणण्यासाठी आमच्या सरकारनेच विशेष अन्वेषण पथक स्थापन केले. यानंतर या प्रकरणी सुमारे १५० तक्रारी पोलिसांकडे आलेल्या आहेत. भूमी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी खान याने कोठडीतून पलायन केल्याच्या प्रकरणी पोलीस हवालदारावर कारवाई करण्यात आलेली आहे. सिद्दीकी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात सापडणार आहे.’’
सौ. सुलक्षणा सावंत यांच्याकडून ‘आप’च्या नेत्यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा
पणजी – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पत्नी सौ. सुलक्षणा सावंत यांनी ‘आप’चे नेते अमित पालेकर आणि संजय सिंग यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा डिचोली येथील प्रथम श्रेणी न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केला आहे. ‘नोकरी विक्री घोटाळ्याच्या प्रकरणी कुटुंबियांवर झालेल्या आरोपाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांनी यापूर्वी कधीही प्रशासकीय कामकाजामध्ये हस्तक्षेप केलेला नाही’, असे भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी १७ डिसेंबर या दिवशी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले.