दत्तजयंतीनिमित्त ‘श्री शिवगिरी’ संप्रदायाच्या दत्त पालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात आगमन !

पालखीतील पादुकांचे पूजन करतांना सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब

पनवेल – प्रतिवर्षीप्रमाणे दत्तजयंतीच्या निमित्ताने ‘श्री शिवगिरी’ संप्रदायाच्या निघणार्‍या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ६.४५  वाजता शंखध्वनी आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात भावपूर्ण वातावरणात आगमन झाले. फुलांच्या माळांनी सजवलेल्या पालखीत श्री दत्तात्रेयांची प्रतिमा, त्यांची मूर्ती आणि प.पू. शिवगिरी महाराजांच्या पादुका आसनस्थ होत्या !

पालखीच्या अग्रस्थानी धर्मदंड हातात घेतलेले भक्त होते. आश्रमात पालखीचे आगमन झाल्यावर धर्मदंड घेतलेल्या भक्तांच्या पायांवर जल अर्पण करण्यात आले आणि धर्मदंडाला कुंकू लावून त्याचे पूजन करण्यात आले, तसेच कलशपूजन करण्यात आले. पालखीतील श्री दत्तात्रेयांच्या प्रतिमेला सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परबकाका यांनी ओवाळले आणि पुष्पहार अर्पण केला. धर्मध्वज आणि धर्मदंड यांचे पूजन सनातनचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. यशवंत वसाने यांनी केले. मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतून शिवगिरी संप्रदायाचे भक्त या पालखीत सहभागी होण्यासाठी आले होते.

क्षणचित्रे

१. अब्दागीर, भगवे ध्वज यांमुळे पालखीत उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

२. ढोलकी, झांज या वाद्यांच्या साथीने आणि टाळ्यांच्या ठेक्यात चालू असलेला दत्तगुरूंच्या नामजपाचा जयघोष यांमुळे पालखी आश्रमात आल्यावर क्षणार्धात वातावरणात पालट होऊन उत्साह अन् चैतन्य निर्माण झाले.