‘सनबर्न’ला पर्यटन खात्याकडून तत्त्वत: मान्यता
पणजी, १२ डिसेंबर (वार्ता.) – धारगळ, पेडणे येथे २८ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिव्हल’च्या आयोजनासाठी पर्यटन खात्याने १२ डिसेंबर या दिवशी तत्त्वत: मान्यता दिली आहे. ‘सनबर्न’चे आयोजक ‘स्पेसबाऊंड वेब लॅब प्रा.लि.’ यांना ही मान्यता देण्यात आली आहे.
डिसेंबर मासाच्या प्रारंभी धारगळ पंचायतीने स्थानिक आणि पेडणेचे भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांचा विरोध डावलून धारगळ येथे ‘सनबर्न’ महोत्सवाच्या आयोजनासाठी काही अटींवर संमती दिली होती. ‘सनबर्न’चे मुख्य कार्यकारी अधिकारी करण सिंह यांनी यापूर्वी ‘सनबर्न’च्या धारगळ येथील नवीन स्थळाविषयी माध्यमांशी बोलतांना म्हटले होते की, ‘सनबर्न’चे धारगळ येथील नवीन स्थळ मोपा (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) विमानतळापासून १५ कि.मी. अंतरावर आहे. धारगळ गावापासून मांद्रे, आश्वे, हरमल, बागा, कळंगुट आणि मोरजी हे समुद्रकिनारे जवळ आहेत. ‘सनबर्न २०२४’मध्ये १५० हून अधिक विख्यात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संगीत कलाकार सहभागी होणार आहेत. यामुळे ‘सनबर्न’मध्ये सहभागी होणार्यांना नवीन अनुभव मिळणार आहे. यापूर्वी ‘सनबर्न’ महोत्सव हणजूण येथील समुद्रकिनार्यावर होत होता.
‘सनबर्न’च्या विरोधात न्यायालयात ३ याचिका प्रविष्ट (दाखल)
धारगळ, पेडणे येथे आयोजित करण्यात येणार्या ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिव्हल’ला नागरिकांचा विरोध डावलून धारगळ पंचायतीने तत्त्वत: ‘ना हरकत’ दाखला दिला आहे. याला विरोध करून याचिकादार प्रमेश प्रभुदेसाई यांच्यासह एकूण १७ जणांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केलेली आहे. ‘सनबर्न’प्रकरणी ही तिसरी याचिका आहे.
यापूर्वी भरत बागकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केलेली आहे. यामध्ये राज्य सरकार, धारगळ पंचायत आणि ‘सनबर्न’चे आयोजक ‘स्पेसबाऊंड वेब लॅब प्रा.लि.’ यांना प्रतिवादी केले आहे. धारगळ पंचायतीच्या ग्रामसभेत ‘सनबर्न’ला नागरिकांनी विरोध केला असतांनाही पंचायत मंडळाने ५ विरुद्ध ४ मतांनी ‘सनबर्न’ला संमती दिली. याचिकादार भरत बागकर यांनी पंचायत मंडळाच्या या निर्णयाला विरोध केला आहे, तसेच या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) माध्यमातून अन्वेषण करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी प्रविष्ट झालेल्या पहिल्या याचिकेत याचिकादाराने धारगळ येथे मद्य आणि इतर प्रतिबंधित पदार्थ यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली आहे.