पणजी, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘गोवा कर्मचारी भरती आयोग’ लवकरच राज्यशासनातील १ सहस्र ९२५ पदांसाठी भरती प्रक्रियेला प्रारंभ करणार आहे. यासंबंधीचे विज्ञापन लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘गोवा कर्मचारी भरती आयोगा’ने आतापर्यंत सरकारी खात्यांमधील ६९ रिक्त पदांसाठी विज्ञापन प्रसिद्ध करून संगणकावर आधारित (सीबीटी) ११ परीक्षा घेतलेल्या आहेत, तर त्यातील काही जणांना नियुक्ती पत्रेही देण्यात आली आहेत.’’ सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निश्चित केलेल्या नियमावलीनुसार आयोगाने सर्व सरकारी खात्यांच्या प्रमुखांना १ ते ३१ जानेवारी या काळात आपापल्या खात्यातील रिक्त पदांची माहिती सादर करण्याची सूचना केली होती. या माहितीच्या आधारे आयोगाने वर्ष २०२३ मध्ये एकूण ३३ रिक्त पदे भरली. वर्ष २०२४ मध्ये शिक्षण खात्यातील ३६ प्रशिक्षित इंग्रजी शिक्षकांना सेवेत सामावून घेतले आहे. त्यानंतर आता १ सहस्र ९२५ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया चालू आहे. सरकारी नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक केल्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर कर्मचारी भरती आयोगाला बळकटी देऊन आयोगाच्या माध्यमातूनच सरकारी नोकर्या देण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
कर्मचारी भरती प्रक्रिया
कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणार्या ‘सीबीटी’ परीक्षांना बसणारे उमेदवार परीक्षा संपताच तात्काळ संगणकावर त्यांनी प्राप्त केलेले गुण पाहू शकतात. परीक्षा संपताच २४ घंट्यांच्या आत कर्मचारी भरती आयोग त्यांच्या संकेतस्थळावरून निकाल घोषित करतो, तसेच त्याच दिवशी किंवा दुसर्या दिवशी आयोग उमेदवाराला त्याच्या ‘लॉगइन’द्वारे (संगणकीय पत्त्याद्वारे) त्याची उत्तरपत्रिका उपलब्ध करून देतो. प्रश्नपत्रिकेसंबंधी काही तक्रारी असल्यास त्यासाठी ३ दिवसांची मुदत देण्यात येते. अशा तक्रारी आल्यास आयोग त्या तज्ञांकडे पाठवतो. तज्ञांच्या निर्णयानंतर आठव्या दिवशी अंतिम निकाल घोषित केला जातो. भरतीची सर्व प्रक्रिया २ आठवड्यांमध्येच पूर्ण होते.