स्थानिक लोकांनी विरोध करत देशातून निघून जाण्याची चेतावणी
वेलिंग्टन (न्यूझीलंड) – कॅनडानंतर खलिस्तान समर्थकांनी भारतविरोधी कारवाया पसरवण्यासाठी न्यूझीलंडची निवड केली आहे. बंदी घातलेल्या ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने १७ नोव्हेंबर या दिवशी न्यूझीलंडमध्ये खलिस्तान जनमत चाचणी आयोजित करण्यात आली. या वेळी खलिस्तानी समर्थकांनी भारतविरोधी घोषणाबाजी केली आणि खलिस्तानी झेंडे फडकावले; पण खलिस्तानींच्या या कृतीमुळे न्यूझीलंडमधील स्थानिक लोक संतप्त झाले आहेत. खलिस्तान समर्थकांच्या या सार्वमत संग्रहाला न्यूझीलंडचे लोक विरोध करत आहेत. ज्या ठिकाणी जनमत घेतले जात होते, त्या ठिकाणी न्यूझीलंडचा एक नागरिक तेथे पोचला आणि त्याने निषेध केला.
१. या नागरिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो हातात ध्वनीवर्धक (हँड माइक) घेऊन खलिस्तानींच्या विरोधात घोषणाबाजी करतांना आणि त्यांना न्यूझीलंड सोडून जाण्यास सांगतांना दिसत आहे. ‘हा झेंडा येथे फडकवण्याचे तुमचे धाडस कसे झाले ? तुमच्या देशात परत जा. तुमचे परदेशी धोरण आमच्या देशात आणू नका. तुम्हाला वाटते की, तुम्ही या देशात याल आणि तुमचा ध्वज फडकवाल, तर तुमच्या ध्वजाचे या देशात स्वागत नाही. आम्ही येथे केवळ लाल, पांढरा आणि निळा ध्वज फडकवतो, जो न्यूझीलंडचा ध्वज आहे.’
२. न्यूझीलंडमधील खलिस्तानासाठी होणार्या सार्वमत चाचणीला विरोध करतांना परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर म्हणाले होते की, यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील संबंधांवर परिणाम होऊ शकतो.
३. जयशंकर यांनी यापूर्वी न्यूझीलंडचे परराष्ट्रमंत्री विन्स्टन पीटर्स यांना खलिस्तानींना व्यासपीठ न देण्यास सांगितले होते.
संपादकीय भूमिकान्यूझीलंडच्या नागरिकांनी जे केले, ते कॅनडातील नागरिक का करू शकत नाहीत ? खलिस्तान्यांकडून कॅनडामध्ये शांतता आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन होत असतांना कॅनडातील नागरिक गप्प का ? |