|
पणजी, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘गोव्याला गुंतवणुकीचे चैतन्यदायी ठिकाण आणि उदयोन्मुख उद्योगांचे भरभराटीचे केंद्र बनवण्यासाठी सरकार पर्यटनाच्या पलीकडे वाटचाल करत आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. ‘अमेझिंग गोवा-ग्लोबल बिझनेस समिट २०२४’मध्ये (अमेझिंग गोवा-जागतिक व्यवसाय परिषद २०२४मध्ये) ते बोलत होते. गोव्यातील या शिखर परिषदेत सहभागी झालेले ५० हून अधिक देशांतील प्रतिनिधी, मान्यवर आणि व्यावसायिक यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.
गोव्यात उद्योगांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतांना सावंत म्हणाले, ‘‘प्रक्रिया सुलभ करणारी, प्रोत्साहन देणारी आणि व्यवसाय सुलभतेला सर्वोच्च प्राधान्य देणारी धोरणे कार्यवाहीत आणून व्यवसायाला पोषक वातावरण विकसित करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. अक्षय्य ऊर्जेचा अवलंब, सागरी तण लागवडीसह निळी अर्थव्यवस्था आणि शाश्वत मत्स्यपालन; अन्न प्रक्रिया, माहिती तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकास; सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धीमत्ता, आरोग्य आणि कल्याण (पारंपरिक आयुर्वेद आणि आधुनिक औषध); शिक्षण, क्रीडा यांसह बैठका, प्रोत्साहन, परिषदा आणि प्रदर्शने यांवर राज्याने लक्ष केंद्रित केले आहे. गोवा हे चैतन्यदायी आर्थिक केंद्र असून गोव्याच्या भविष्यात गुंतवणूक करण्यासाठी मी गुंतवणूकदारांना आमंत्रित करत आहे. गोवा सायबर सुरक्षा संशोधन आणि सेवांसाठी अनुकूल वातावरण आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि ब्लॉकचेन आस्थापनांसाठी पसंतीचे स्थळ बनण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. व्यवसाय सुलभतेत सातत्याने सुधारणा करून, व्यवसाय-स्नेही धोरणांना चालना देऊन, रहाणीमान वाढवून आणि आपल्या पायाभूत सुविधांचा विस्तार करून गोवा सरकार व्यवसाय केंद्र म्हणून गोव्याचे स्थान बळकट करण्यासाठी वचनबद्ध आहे. ‘अमेझिंग गोवा’ जागतिक व्यवसाय शिखर परिषद आशादायक परिणाम देईल, गोव्याच्या व्यवसायांना जागतिक व्यासपीठ प्रदान करील आणि मौल्यवान देवाणघेवाणीला चालना देईल.’’
अमेझिंग गोवा जागतिक व्यवसाय परिषद ही आर्थिक वाढीसाठी एक शक्तीशाली उत्प्रेरक ! – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला. ते म्हणाले, ‘‘अमेझिंग गोवा जागतिक व्यवसाय परिषद केवळ गोव्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी आर्थिक वाढीसाठी एक शक्तीशाली उत्प्रेरक म्हणून काम करत आहे. उद्योजक आणि उद्योगातील नेत्यांसाठी सहकार्य, तसेच नावीन्यपूर्ण आणि जागतिक संधींचा लाभ घेण्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ आहे. यामध्ये गुंतवणुकीतील भागीदारी व्यवसायांसाठी नवीन मार्ग उघडतील, तसेच भारताला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र म्हणून चालना मिळेल.’’
दुपारच्या सत्रात केंद्रित सत्रांची मालिका आयोजित करण्यात आली होती. येथे उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी आरोग्य आणि निरोगीपणा क्षेत्रातील नवीनतम आव्हाने अन् तंत्रज्ञान यांवर चर्चा करून उपस्थितांना मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान केली. त्यानंतर आयटी, एआय, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर एक सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये या तंत्रज्ञानासमोरील आव्हाने आणि संधींचा शोध घेण्यात आला. दुसर्या सत्रात पारंपरिक शिक्षणासह तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करत नवीन अर्थव्यवस्था कौशल्यांना चालना देण्यासाठी शिक्षणामध्ये तंत्रज्ञानावर आधारित कौशल्यांच्या महत्त्वावर भर देण्यात आला.