|
माद्रिद (स्पेन) – स्पेनमधील व्हॅलेन्सिया शहरामध्ये २९ ऑक्टोबर या दिवशी ८ घंट्यांत १ वर्षात पडतो, इतका पाऊस पडला. यामुळे येथे पूर आला. या पुरात २१७ लोकांचा मृत्यू झाला. गेल्या ५० वर्षांत असा पूर आला नव्हता. अनेकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधी मिळाली नाही. आता येथे पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी गेलेल्या राजा फिलिप आणि त्यांची पत्नी राणी लेटिजिया यांच्यावर लोकांनी चिखलफेक केली. तिथे उपस्थित लोकांनी ‘खूनी’ आणि ‘आम्हाला तुमची लाज वाटते’ अशी घोषणाही दिल्या. या वेळी राजा फिलिप यांच्यासमवेत स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ हेही उपस्थित होते. ‘पूर रोखण्यासाठी नेत्यांनी अगोदर काहीच का केले नाही ?’, असा प्रश्न लोक त्यांना विचारत होते. यानंतर राजा फिलिप आणि पंतप्रधान सांचेझ यांना त्यांचा दौरा अपूर्ण सोडून राजधानी माद्रिदमध्ये परतावे लागले. या वेळी लोकांनी पंतप्रधानांच्या गाडीवरही आक्रमण केले. नागरिकांच्या संतापामुळे त्यांना रोखण्यासाठी पुढे आलेल्या सुरक्षारक्षकांपैकी २ जण घायाळ झाले.
१. व्हॅलेन्सियाचे खासदार जुआन बॉर्डेरा म्हणाले की, राजा फिलिप यांनी पूरग्रस्त भागाला भेट देण्याचा निर्णय अत्यंत वाईट होता. लोक फार संतापले. याविषयी अधिकार्यांनी लोकांना ताकीद दिली होती; मात्र लोकांनी अधिकार्यांचे ऐकले नाही.
२. पूरग्रस्त भागात साहाय्य कार्यासाठी १ सहस्रांहून अधिक सैनिक तैनात करण्यात आले आहेत; मात्र पुरेसे साहाय्य त्यांच्यापर्यंत पोचत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पुरामुळे रस्ते खराब झाले असून दळणवळण अन् वीजवाहिन्य यांची हानी झाल्यामुळे अनेक भाग अजूनही शहरांपासून तुटलेले आहेत. आपत्कालीन सेवा कर्मचारी मृतदेहांचा शोध घेत आहेत.