कॅनडाचे उप परराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी दिली होती ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला माहिती !
ओटावा (कॅनडा) – कॅनडाचे उप परराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी कॅनडाच्या संसदीय समितीमध्ये दावा केला की, ‘देशातील शीख फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्याच्या कटामागे भारताचे गृहमंत्री अमित शहा आहेत.’ कॅनडाच्या मंत्र्याने उघडपणे भारत सरकारच्या मंत्र्याचे नाव घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि कॅनडातील भारतीय उच्चायुक्त यांनी या प्रकरणावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही; मात्र भारत सरकारने कॅनडाचे यापूर्वीचे सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत यामध्ये कोणत्याही प्रकारे सहभागी असल्याला स्पष्ट नकार दिला आहे.
१. १४ ऑक्टोबर या दिवशी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने कॅनडाच्या अधिकार्यांचा हवाला देत दावा केला होता की, गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ यांनी संयुक्तपणे कॅनडात गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी अन् खलिस्तानी आतंकवाद्यांवर आक्रमण करण्याची अनुमती दिली होती.
२. कॅनडातील वृत्तपत्र ‘सीबीसी न्यूज’नुसार डेव्हिड मॉरिसन सार्वजनिक सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा समिती यांच्यासमोर साक्ष देण्यासाठी आले होते. या समितीशी संबंधित खासदार रॅकेल डँचो यांनी मॉरिसन यांना विचारले की, ‘ही माहिती वॉशिंग्टन पोस्टपर्यंत कशी पोचली ?’
३. यावर मॉरिसन म्हणाले, ‘मी जाणूनबुजून ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ची निवड केली. खरेतर, आम्हाला एक असे वृत्तपत्र हवे होते, जे आंतरराष्ट्रीय असेल आणि आमची (कॅनडाची) माहिती सांगू शकेल. त्यासाठी या विषयाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि यापूर्वीही या विषयावर अनेकदा लेखन केलेल्या पत्रकाराची निवड केली. मी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला सांगितले की, भारताचे गृहमंत्री या प्रकरणात गुंतले आहेत. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या पत्रकाराने मला विचारले की, ही (अमित शहा) तीच व्यक्ती आहेत का ? मी म्हणालो ‘होय, तीच व्यक्ती आहे.’ (‘आधीच मरकट त्यात मद्य प्यायला’ असेच या घटनेवरून म्हटले पाहिजे. भारतद्वेषाची काविळ झालेल्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला भारतावर आसूड ओढण्याची याहून चांगली संधी कोणती मिळणार ? – संपादक)
संपादकीय भूमिकाकॅनडाने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला, तरी ते सत्य होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे ! |