बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप !
पुणे – बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याच्या प्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एस्.आर्.ए.) कार्यालयातील तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव आणि पत्नी प्रतीक्षा यादव यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव कार्यरत होते. त्यांच्याकडे वैध उत्पन्नापेक्षा अधिक १ कोटी ३८ लाख ७४ सहस्र रुपये बेहिशोबी मालमत्ता आढळून आली होती. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून यादव यांना स्पष्टीकरण देण्याची संधी देऊनही त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही. यादव यांनी भ्रष्ट मार्गाने बेहिशोबी मालमत्ता धारण केल्याचे, तसेच त्यासाठी पत्नी प्रतीक्षा यांनी प्रेरणा दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणी ‘एसीबी’कडून बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.