‘विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन । स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते’ ।।, याचा अर्थ राजा आणि विद्वान यांच्यात कोणतीही तुलना होऊ शकत नाही; कारण राजा केवळ त्याच्या राज्यात सन्माननीय असतो; पण विद्वान सर्वत्र पूजनीय असतात. अशा प्रकारे विद्वानांचा गौरव या श्लोकात केला आहे. नावाने ‘पंडित’ असलेल्या भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी संस्कृतचा ‘मृतभाषा’ म्हणून उपहास केला, तर ज्ञानाने ‘पंडित’ असलेल्या वसंतराव गाडगीळ यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व जाणून तिच्या प्रचारासाठी आयुष्य वेचले. व्यक्ती समाजात केवळ हुशार आणि बुद्धीमान असली, म्हणून ती आदरणीय ठरत नाही, तर तिला नम्रता, सुसंस्कृतता, सहृदयता आदी गुणांनी ‘आदरणीय’ ठरते. पंडित वसंतराव गाडगीळ अशा अनेक गुणांचा समुच्चय होते. गुळाच्या ढेपेकडे जशा मुंग्या आकृष्ट होतात, त्याप्रमाणे अशा व्यक्तीमत्त्वाकडे समाज आकृष्ट होतो. पंडित वसंतराव गाडगीळ हेही एक असेच विविध गुणसंपन्न व्यक्तीमत्त्व होते. संस्कृती पुढे प्रवाहित करून त्याद्वारे समाज घडवण्यात अशा व्यक्तीमत्त्वाचे योगदान मोलाचे ठरते. धनाढ्य व्यक्तीचा संचय हा तिच्या संपत्ती आणि मालमत्ता यांच्यापुरता मर्यादित असतो; परंतु पंडित वसंतराव गाडगीळ यांच्यासारख्या विद्वानांची खरी संपत्ती, म्हणजे त्यांनी घडवलेली भावी पिढी ! पंडित वसंतराव गाडगीळ यांचे जाणे हे समस्त सारस्वत, संस्कृतप्रेमी यांना वेदनादायी आहे; परंतु त्यांनी आयुष्यभर केलेले संस्कृत रक्षण आणि संवर्धन यांचे कार्य पुढेही चालू ठेवणे, हे त्यांच्या कार्यात आपले योगदान ठरेल.
गोवा येथील एका कार्यक्रमात पंडित वसंतराव गाडगीळ यांनी त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला होता. भारताची फाळणी झाली, तेव्हा ते पाकिस्तानमधील कराची येथील एका शाळेत शिकत होते. त्या वेळी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी, म्हणजे १४ ऑगस्ट १९४७ या दिवशी शाळेमध्ये शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पाकिस्तानचे जयगीत म्हणायला सांगितले. त्या वेळी वेगळे कोणते गीत सिद्ध केलेले नसल्यामुळे शिक्षकांनी ‘सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा’, या गीतामध्ये ‘पाकिस्तान’ हा शब्द घालून गाणे म्हणायला सांगितले; परंतु पंडित वसंतराव गाडगीळ यांनी पाकिस्तानचा जयघोष करण्यास नकार दिला. कराची येथून पुणे येथे आल्यावर ‘टिळक महाराष्ट्र विद्यापिठा’त संस्कृत विषय घेऊन त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. भारताच्या राष्ट्रगीतात भारतभूमीच्या वर्णनात ‘सिंध’ प्रांताचा उल्लेख आहे; मात्र हा प्रांत सध्या पाकिस्तानमध्ये आहे, याची त्यांना खंत होती. ‘पाकिस्तानमधील सिंधु नदीच्या तीरावर पुन्हा भारतमातेचा जयघोष व्हावा’, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्यातील हा प्रखर राष्ट्रवाद अनुकरणीय आहे.
लोभस व्यक्तीमत्त्व !
पंडित वसंतराव गाडगीळ यांनी संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी पुणे येथून ‘शारदा’ हे मासिक चालू केले. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा ‘कवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ देऊन गौरव केला. संस्कृतचा प्रचार व्हावा, यासाठी विविध कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करतांना ते संस्कृत भाषेत बोलत. सद्यःस्थितीत सरकारकडून संस्कृत भाषेचा पुरस्कार तर दिला जातो; मात्र खर्या अर्थाने संस्कृतमधील ज्ञानाच्या प्रसारासाठी पंडित वसंतराव गाडगीळ यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य वेचले. ‘गुणेन स्पृहणीय: स्यान्न रूपेण युतो नर: ।’, म्हणजे केवळ देखणा आहे म्हणून कौतुक होण्यापेक्षा व्यक्ती तिच्यातील गुणांमुळे हवाहवासा वाटायला हवा. पंडित वसंतराव गाडगीळ हेही त्यांच्यातील गुणसमृद्धीमुळेच लोभस होते. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २०१२ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असतांना पंडित गाडगीळ यांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. त्या वेळी पंडित वसंतराव गाडगीळ यांच्याविषयी गौरवोद्गार काढतांना ‘यांच्या (पंडित वसंतराव) आईने यांना रांगायला शिकवले नाही, हे तर पळतच आहेत’, अशा शब्दांमध्ये त्यांच्या संस्कृत भाषेच्या प्रसारकार्याचे कौतुक केले होते.
निरपेक्ष कार्य करणारे व्यक्तीमत्त्व !
पंडित वसंतराव गाडगीळ यांनी संस्कृत भाषेचे वैभव, महत्त्व आणि सामर्थ्य जाणले होते. त्यामुळे त्यांनी स्वत:चे जीवन संस्कृतच्या प्रसारासाठी समर्पित केले. त्यांचे हे कार्य निरपेक्ष होते. काँग्रेसचे नेते आणि भारताचे ५ वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद एकदा पुणे येथे आले असतांना पंडित वसंतराव गाडगीळ यांनी त्यांना पुणे येथील प्रसिद्ध श्री दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पूजेचे निमंत्रण दिले. त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून फक्रुद्दीन अली अहमद यांनी श्री गणेशाची षोडशोपचार पूजा केली. यातून पंडित गाडगीळ यांच्या व्यक्तीमत्त्वाची प्रचीती येते. त्यांच्या निरपेक्षपणामुळेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यापर्यंत त्यांच्या कार्याची ओळख होती. केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही त्यांनी संस्कृत भाषेच्या प्रचाराचे कार्य केले. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णाेद्धार केला, त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील प्रतिनिधी म्हणून पंडित वसंतराव गाडगीळ उपस्थित होते. त्यांचे संस्कृत प्रचाराचे कार्य जात-पात, पंथ, संप्रदाय, प्रांत यांच्या पलीकडचे होते. त्यांची विद्वता, संस्कृतवरील प्रेम, कार्याची तळमळ आणि अथक परिश्रम यांमुळे संस्कृत भाषेच्या समृद्धीसाठी ते एखाद्या शिलेदाराप्रमाणे आयुष्यभर लढले.
सद्यःस्थितीत संस्कृत भाषेची स्थिती अतिशय विदारक आहे. तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असला, तरी संस्कृतचा प्रसार-प्रसार खंडित झाला आहे. अभिजात भाषेच्या दर्जामुळे विद्यापिठे आणि अन्य शैक्षणिक संस्था यांमध्ये अभ्यासक्रमात संस्कृत भाषेचा समावेश आहे; मात्र संस्कृत विषय केवळ परीक्षेत गुण मिळवण्यापुरता मर्यादित झाला आहे. जातीयवादी मंडळी ‘संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा’ असल्याचे फुत्कार सोडत आहेत. याला दोषी आपणच आहोत. संस्कृतमधील विश्वकल्याण साधणारे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचे सोडून या ज्ञानाचा उपयोग केवळ पोटपूजेपुरता सीमित करण्याचे पाप झाले. मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या काँग्रेसने संस्कृतला दुर्लक्षित केले. संस्कृतच्या या केविलवाण्या स्थितीत पंडित वसंतराव गाडगीळ यांनी ‘संस्कृत ही ज्ञानभाषा आहे’, हे सांगण्याचे केलेले कार्य निश्चित महनीय आहे. ‘संस्कृतचा प्रचार हा केवळ संवादापुरता नाही, तर यातून संस्कृती, समृद्धी, ज्ञान, वैभव, नीतीमत्ता, पावित्र्य, शील, सामर्थ्य आदी अनमोल गुणांचा समाजात प्रसार होईल’, याची जाण पंडित वसंतराव गाडगीळ यांना होती. त्यामुळे पंडित नेहरू यांनी संस्कृतला ‘मृतभाषा’ ठरवून चूक केली; मात्र पंडित वसंतराव गाडगीळ यांनी संस्कृतचा प्रसार केला. भारतियांनी पंडित वसंतराव गाडगीळ यांचे अनुकरण करायला हवे. त्यांच्या कार्यात योगदान देणे, हीच त्यांना खर्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल !
संस्कृत भाषेचे वैभव, महत्त्व आणि सामर्थ्य ओळखून तिच्या संवर्धन कार्यात योगदान द्या ! |