भारतीय संस्कृतीतील अन्य विषयांवर भाष्य आणि त्याचे पैलू !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘राजकारण, प्रवास, भारतीय पाहुणचार, मांसाहार, सोमरस, जातीय अपप्रचार आणि संस्कृत भाषेची शास्त्रीयता’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.        

(भाग ६१) प्रकरण ११ 

भाग ६० वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/839747.html

१०. प्राचीन गणितशास्त्र

भारतियांना गणितशास्त्राचे ज्ञान सहस्रो वर्षांपासून आहे. काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. ज्याला पायथागोरसचा सिद्धांत म्हणतात, तो ‘बौधायना’च्या ‘शूल्बसूत्रां’त इ.स.पू. ६ व्या शतकात आला आहे. तो श्लोकाच्या रचनेत दिला आहे.

दीर्घचतुरस्रस्याक्ष्णया रज्जुः पार्श्वमानी
तिर्यङ्मानी चयत्पृथग्भूते कुरुतस्तदुभयं करोति ।

– बौधायन शुल्बसूत्र, अध्याय १, सूत्र ४८

अर्थ : आयताच्या अक्ष्णारज्जूवरील (कर्णरेषेवरील) चौरसाचे क्षेत्रफळ पार्श्वमानी आणि तिर्यङ्मानी या दोन कडांवरील वेगवेगळ्या चौरसांच्या क्षेत्रफळांच्या मिळवणीइतके (बेरजेइतके) असते.

२.  २ आणि ३ यांना अनुक्रमे द्विकर्णी अन् त्रिकर्णी, अशी नावे बौधायन देतो.

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

३. खालील सूत्र असे सांगते की, एका युगात पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती १, ५८, २२, ३७, ५०० वेळा पूर्वेकडे फिरते, हे सूत्र असे आहे.

युग कु ङि शिवुण्लृष्खृ प्राक् ।

या सूत्रात्मक अक्षरांचे अर्थ लावणे, हे आणखी एक शास्त्र आहे. हा श्लोकार्थ आर्यभट्टांच्या ‘आर्यभाटीया’मध्ये आहे.

जगन्नाथपुरीचे एक माजी शंकराचार्य महान गणिती होते. त्यांनी ‘वैदिक मॅथेमॅटीक्स’ या नावाचा जगातील गणितशास्त्रज्ञांना चक्रावून टाकणारा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘गणितशास्त्राच्या इतिहासाचे सत्यान्वेषी तज्ञ जे म्हणतात की, पाश्चात्त्यांचे अत्युच्च गणितज्ञान अजून भारतीय गणितशास्त्राच्या उंबर्‍यापर्यंतसुद्धा पोचलेले नाही, ते अतिशयोक्तीच्या दोषास मुळीच पात्र नाहीत.’

११. प्राचीन विमानविद्या

सहस्रो वर्षांपूर्वी विमानविद्या भारतात इतकी प्रगत होती की, रामायण, महाभारत, भागवत इत्यादींमध्ये वारंवार जे आकाशातील संचाराचे उल्लेख येतात, ते अगदी निःसंशय खरे आहेत. भरद्वाजमुनींनी ‘यंत्रसर्वस्व’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. यात ४० विभाग असून ‘वैमानिक प्रकरण’ हे त्यातील अत्यंत महत्त्वाचे आहे. या विभागात ८ प्रकरणे, १०० विषय आणि ५०० सूत्रे आहेत. या ग्रंथावर बोधानंद यती यांनी ‘बोधानंदवृत्ती’ नावाचा विस्तृत विवेचन करणारा टीकाग्रंथ लिहिला आहे. त्यात ३ सहस्र श्लोक आहेत. या ग्रंथावरून हेही स्पष्ट झाले आहे की, त्यापूर्वी शेकडो वर्षे नारायण ऋर्षींनी ‘विमानचंद्रिका’, शौनकांनी ‘व्योमायन यंत्र’, गर्गांनी ‘यंत्रकल्प’, वाचस्पतींनी ‘यानबिंदू’, चक्रायणींनी ‘खेतयान प्रदीपिका’ आणि धुंडिनाथांनी ‘व्योमायनर्क प्रकाश’ हे ग्रंथ लिहिले होते. ‘वि’ म्हणजे पक्षी, ‘मान’ म्हणजे आकार. पक्ष्याच्या आकाराचे म्हणून विमान !

११ अ. भरद्वाजांनी वर्णिलेले विमानांचे ३ प्रकार

१. देशात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणारे.

२. एका देशातून दुसर्‍या देशात जाणारे

३. एका ग्रहावरून दुसर्‍या ग्रहावर जाणारे

तसेच ‘त्रिपुर’ नावाचे एक विमान भूमी, पाणी आणि आकाश यामार्गे तितक्याच सहजतेने धावणारे, उडणारे ! एकूण २५ प्रकारांच्या विमानांची माहिती त्यात आहे.

११ आ. विमानांचे आणखी तीन प्रकार

१. मांत्रिक २. तांत्रिक ३. यांत्रिक

भरद्वाज ज्यांच्याविषयी अत्यंत आदराने लिहितात, ते आहेत विश्वकर्मा, छायापुरुष, मनू, मय इत्यादी. काही विमाने व्यापारासाठी, तर काही लढाऊ विमानेही असत. ती विशिष्ट धातूंपासून बनवली जात. काही विमाने प्रति घंटा १ सहस्र ते २० सहस्र मैलांच्या वेगाने उडत. लढाऊ विमानात वायरलेस, टेलिफोन, टेलिव्हिजन, थर्मामीटर, बॅरोमीटर इत्यादी साधने असत. पाऊस, वादळ, सूर्याची प्रखर उष्णता यांपासून रक्षण करणारी रोधकेही त्यात असत. (याविषयी कॅ. बोडस यांचे ‘विमानविद्या’ हे पुस्तक वाचा.)

१२. समारोप

स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘जे तुमचे युरोपीय विद्वान म्हणतात की, आर्य बाहेरून हिंदुस्थानात आले आणि त्यांनी येथील माणसांना हुसकावून लावले, हे सगळे धादांत खोटे अन् मूर्खपणाचे आहे. आश्चर्य हे की, आमचे भारतीय विद्वान त्याला मान डोलावतात ! हे सारे भयानक असत्य आमच्या मुलांना शिकवले जात आहे, हे अगदी वाईट आहे.

मी आमच्या भारतीय पंडितांना विनंती करतो की, आपल्या प्राचीन पुस्तकांचा कसून अभ्यास करा आणि तुमचे स्वतःचे निर्णय शोधून काढा. कोणत्या वेदांत आणि सूक्तात आर्य बाहेरून आल्याचे तुम्हाला आढळते, ते बघा ! त्या आर्यांनी येऊन येथील जंगली लोकांच्या कत्तली केल्या, ही कल्पना आहे तरी कुठे ? असल्या मूर्ख बडबडीने तुम्हाला काय मिळते ? धिक्कार असो, तुमच्या रामायणाच्या अभ्यासाचा.’’

– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सु.ग. शेवडे, चेंबूर, मुंबई.                 (समाप्त)

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)