Ajmer Dargah Controversy : शिवमंदिर पाडून मोईनुद्दीन चिश्ती दर्गा बांधला असून हे मंदिर हिंदूंना परत करावे  !

हिंदु सेनेची अजमेर (राजस्थान) जिल्हा न्यायालयात याचिका !

मोईनुद्दीन चिश्ती दर्गा

अजमेर (राजस्थान) – अजमेर जिल्हा न्यायालयात येथील प्रसिद्ध मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या विरोधात दिवाणी खटला प्रविष्ट (दाखल) करण्यात आला आहे. ‘अजमेर दर्गा हे शिवमंदिर असून हे मंदिर कह्यात घेऊन तेथे दर्गा बांधण्यात आला आहे. दर्गा समितीला जागेवरील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश द्यावेत, तसेच हे ठिकाण भगवान श्री संकटमोचन महादेव विराजमान मंदिर म्हणून घोषित करावे आणि मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारला सूचना द्यावी’, अशा मागण्या या याचिकेत करण्यात आल्या आहेत. हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी ही याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.

१. याचिकेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दर्ग्याचे सर्वेक्षण करण्यासाठी निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या छताची रचना हिंदु रचनापद्धतीप्रमाणे आहे. यावरून ते मंदिर असल्याचे सिद्ध होते.

२. याचिकेत पुढे म्हटले आहे की, या छतांची सामग्री आणि शैली त्यांचे हिंदु मूळ स्पष्टपणे अधोरेखित करते. दुर्दैवाने रंग आणि अन्य प्रक्रिया यांमुळे त्यांचे उत्कृष्ट कोरीवकाम लपवले गेले आहे. हा रंग काढून टाकल्यास वास्तव समोर येऊऊ शकते. येथील तळघरात गर्भगृह आहे.

३. विष्णु गुप्ता यांनी याचिकेत म्हटले आहे की, ‘अजमेर दर्गा रिकाम्या जागेवर बांधण्यात आला होता’, हे दर्शवणार्‍या कोणत्याही नोंदी उपलब्ध नाहीत. त्याऐवजी ऐतिहासिक अहवाल असे सूचित करतात की, त्या ठिकाणी महादेव मंदिर आणि जैन मंदिरे होती. तेथे  हिंदु आणि जैन भाविक त्यांच्या देवतांची पूजा करत होते. येथे हिंदू भगवान शंकराचा जलाभिषेक करत असत.

४. या याचिकेत अजमेरचे रहिवासी हरविलास शारदा यांच्या वर्ष १९११ मध्ये लिहिलेल्या ‘ऐतिहासिक आणि वर्णनात्मक’ पुस्तकाचा संदर्भ देण्यात आला आहे. यात सध्याच्या ७५ फूट उंच दरवाजाच्या बांधकामात मंदिराच्या ढिगार्‍याचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हरविलास शारदा हे ‘रॉयल एशियाटिक ब्रिटन आणि आयर्लंड’चे सदस्य होते. यासह ते अजमेरचे अतिरिक्त आयुक्तही होते.

५. विष्णु गुप्ता यांनी अधिवक्ता शशी रंजन कुमार सिंह यांच्या माध्यमातून ही याचिका प्रविष्ट केली आहे. त्याची सुनावणी १० ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.

दर्गा समितीने दावा फेटाळला !

मुसलमानांचा दावा आहे की, अजमेर दर्गा त्यांच्या सुफी संप्रदायातील संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची कबर आहे. अखिल भारतीय सूफी सज्जाप्रधान परिषदेचे अध्यक्ष नसीरुद्दीन चिश्ती आणि दर्गा दिवाण सय्यद जैनुल अबेदिनचे उत्तराधिकारी अन् दर्गा सेवकांची संघटना अंजुमन सय्यद जगदानचे सचिव सरवर चिश्ती यांनी विष्णु सेन यांच्या मागणीला निराधार म्हटले आहे. ते म्हणाले की, धार्मिक स्थळांच्या विरोधात षड्यंत्र रचले जात असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. इतिहास पाहिला, तर दर्गा ख्वाजा साहेबांविषयी कधीही आक्षेप घेण्यात आलेला नाही. मोगलांपासून खिलजी आणि तुघलक यांच्यांपर्यंत, हिंदु राजे आणि अगदी मराठ्यांनीही दर्ग्याकडे मोठ्या आदराने पाहिले आणि त्यांची श्रद्धा व्यक्त केली.