(म्‍हणे) ‘एका धोब्‍याचे ऐकून स्‍वत:च्‍या गरोदर पत्नीला घराबाहेर काढणार्‍या व्‍यक्‍तीची आपण मंदिरे बांधतो, हे लज्‍जास्‍पद !’ – ज्ञानेश महाराव

मुंबई येथे संभाजी ब्रिगेडच्‍या अधिवेशनात साप्‍ताहिक चित्रलेखाच्‍या माजी संपादक ज्ञानेश महाराव यांचे प्रभु श्रीरामाविषयी अश्‍लाघ्‍य विधान

प्रभु श्रीरामाविषयी अश्‍लाघ्‍य विधान करणारे ज्ञानेश महाराव

मुंबई – जो व्‍यक्‍ती एका धोब्‍याचे ऐकून स्‍वत:च्‍या गरोदर पत्नीला घराबाहेर काढतो, असा व्‍यक्‍ती देव कसा असू शकेल ? आणि अशा व्‍यक्‍तीची आपण देशात मंदिरे बांधतो, याची आपल्‍याला लाज वाटली पाहिजे, अशी अश्‍लाघ्‍य टीका तत्‍कालीन साप्‍ताहिक चित्रलेखाचे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांनी केली. ते संभाजी बिग्रेडच्‍या मुंबई येथील अधिवेशनात बोलत होते. यातील धक्‍कादायक प्रकार म्‍हणजे हे विधान महाराव यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार आणि काँग्रेसचे कोल्‍हापूर येथील खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्‍या उपस्‍थितीत केले. (हिंदूंनो, पुरोगामित्‍वाच्‍या नावाखाली हिंदूंच्‍या देवतांना अवमान होऊ देणार्‍या अशा राजकारण्‍यांना निवडणुकीच्‍या वेळी लक्षात ठेवा ! – संपादक)

या प्रसंगी ज्ञानेश महाराव म्‍हणाले, ‘‘जर माझ्‍या बहिणीला कुणी घरातून बाहेर काढले, तर मी शांत राहीन का ? तो म्‍हणे एकपत्नी होता ! सायंकाळी चालणार्‍या मालिकेत काय चालते, तर ‘स्‍वामी-स्‍वामी’ ! प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांची बायको म्‍हणते की, ‘वरून उडी मारली तरी स्‍वामी वाचवतील’, मग अशांनाच ऑलिंंपिकमध्‍ये पाठवले पाहिजे. सगळे जर स्‍वामींमुळे होत असले, तर शरद पवार यांनी गेली ५० वर्षांत राजकारण असेच केले का ? काही योजना राबवल्‍या नाहीत का ? शाळा उभ्‍या केल्‍या नाहीत ? अधिकोष उभे केले नाहीत ? (संत त्‍यांच्‍या भक्‍तांसाठी चमत्‍कार करतात. अर्थात जे देव-संत यांना मानतच नाहीत त्‍यांना संतांचे चमत्‍कार काय कळणार आणि अनुभूती काय कळणार ? स्‍वामी समर्थ यांची तुलना राजकारणी शरद पवार यांच्‍याशी करणार्‍या महाराव यांना भक्‍तांनी जाब विचारला पाहिजे ! हिंदूंनी अशा प्रकारची वक्‍तव्‍ये ज्‍यांच्‍यासमोर केली त्‍या लोकप्रतिनिधींना यापुढील निवडणुकीत मतपेटीद्वारे धडा शिकवावा ! – संपादक)

(म्‍हणे) ‘सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण करणार्‍या बायकांची डोकी थार्‍यावर नाहीत का ?’

अथर्वशीर्षाचे पठण करणारे भाविक आणि ज्ञानेश महाराव

‘गणपतीसमोर सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण करणार्‍या बायकांची डोकी थार्‍यावर नाहीत का ?’ असे द्वेषपूर्ण आणि सहस्रो महिला गणेशभक्‍तांचा अवमान करणारे वक्‍तव्‍य तत्‍कालीन चित्रलेखाचे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांनी ३ सप्‍टेंबर या दिवशी केले. ‘अभिव्‍यक्‍ती’ या यू ट्यूब वाहिनीवर त्‍यांची मुलाखत प्रसारित झाली आहे. गेली अनेक वर्षे पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर प्रतीवर्षी सहस्रो महिला अथर्वशीर्ष म्‍हणातत. या वर्षी ३२ सहस्र महिला महाराष्‍ट्राच्‍या विविध भागांतून आल्‍या होत्‍या. (हिजाब आणि बुरखा घालून मिरवणार्‍या मुसलमान महिलांविषयी महाराव यांना काय म्‍हणायचे आहे ? भाविक हिंदु महिलांनी वैध मार्गाने महाराव यांना खडसावणे आवश्‍यक ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • वास्‍तविक रामायणातील उत्तराकांडमधील प्रसंग खरोखर घडले आहेत का ?, याचविषयी मतभेद आहेत; मात्र जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करून स्‍वतःला हिंदुद्वेषाचा कंड शमवण्‍यासाठी महाराव स्‍वतःचे ज्ञान पाजळत आहते !
  • आताचे राजकारणी धोब्‍याचे सोडाच सामान्‍य जनतेच्‍या तक्रारींना केराची टोपली दाखवतात, तसेच विविध मागण्‍यांसाठी आंदोलन करणार्‍यांचीही नोंद घेत नाहीत ! असे असतांना प्रभु श्रीरामाने जी संवेदनशीलता दाखवली, तो मतितार्थ लक्षात का घेतला जात नाही ?
  • ज्ञानेश्‍वर महाराव यांचे हेच धाडस अन्‍य धर्मियांच्‍या प्रेषितांविषयी बोलण्‍याचे आहे का ? हिंदूंच्‍या श्रद्धास्‍थानांचा अवमान करणार्‍यांना कठोर शिक्षा करणार्‍या कायद्याची आता आवश्‍यकता आहे. हिंदू सहिष्‍णु असल्‍यानेच महाराव यांना अशी विधाने करण्‍याचे धैर्य होते !