शिवाजी विद्यापिठाचा नावलौकिक महाराष्ट्रासह भारतात आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन यशस्वी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने या विद्यापिठाची स्थापना झाली. सध्या या विद्यापिठाच्या नामविस्तारावरून वातावरण तापले आहे. ‘विद्यापिठाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्यात यावे’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे. १७ मार्च (आज) या दिवशी या मागणीसाठी कोल्हापूर येथे भव्य मोर्चा काढला जाणार आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी या नामविस्ताराला पाठिंबा दर्शवला आहे. कोल्हापूर येथील शेकडो ग्रामपंचायतींनी नामविस्तारासाठी शासन आणि विद्यापीठ यांना पत्रेही पाठवली आहेत. काही युवकांनी नामविस्ताराच्या मागणीचे फलकही शहरात लावले आहेत. या नामविस्ताराची विविध स्तरांवरून मागणी होत असतांना विद्यापिठाच्या कार्यकारिणीने मात्र विरोध दर्शवला आहे. १५ मार्च या दिवशी कार्यकारिणी आणि विद्यापिठाशी संलग्न पुरोगामी मंडळी यांनी विद्यापिठात झालेल्या बैठकीत ‘नामांतराची मागणी करणार्यांना ठोकून काढू’, अशी गुंडगिरीची भाषा वापरली गेली. ‘शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ होत असेल, तर त्यामुळे महाराजांच्या नावाचा आदराने उल्लेख होईल’, असा सरळसाधा सुखावणारा विचार सर्वसामान्य नागरिकांमध्ये येतो. छत्रपती शिवरायांचा उल्लेख हा आदरानेच व्हावा, असे प्रत्येक शिवप्रेमी, महाराष्ट्र आणि हिंदुत्व प्रेमींना वाटते. एरव्ही साळसूदपणाचा आव आणून सद्सद्विवेकबुद्धी आणि राज्यघटनेचा आदर आदी मोठमोठे शब्दच्छल करणारी पुरोगामी मंडळी या नामविस्तारावरून गुंडगिरीवर उतरण्याइतपत हा विषय मोठा आहे का ? छत्रपती शिवरायांचा आदराने होणार्या उल्लेखासाठी एवढा आडमुठेपणा कशाला ? हा प्रश्न साहजिकच सर्वसामान्यांना पडतो.
हिंदूंच्या तेजोभंगाचा छुपा ‘अजेंडा’ !

खरेतर कोल्हापूरमध्ये पुरोगाम्यांचे प्राबल्य अधिक आहे. मागील काही वर्षांपासून या भागामध्ये साम्यवाद अधिक बळकट होत गेला. बहुतांश शिक्षण संस्था या साम्यवाद्यांच्या कह्यात आहेत. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरमधील कथित पुरोगामी आणि साम्यवादी कॉ. गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता ?’, या नावाचे पुस्तक लिहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती आदर बाळगणारा कुणीही त्यांचा उल्लेख केवळ ‘शिवाजी’ असा एकेरी करत नाही. कॉ. पानसरे यांचे हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव कसे मानणारे होते, याचा आटापिटा करणारे होते. ‘इंग्रज भारतात आल्यामुळे भारताचा विकास झाला. प्राचीन भारत मागासलेला होता’, असा भ्रम या मंडळींनी अनेक वर्षे पसरवला. छत्रपती शिवाजी महाराज यांची मानहानी हिंदु समाज खपवून घेणार नाही आणि स्वत:चे बिंग फुटेल; म्हणून साम्यवादी विचारांच्या या कथित पुरोगाम्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे होते, शिवरायांच्या सैन्यामध्ये मुसलमान मोठ्या संख्येने होते, शिवरायांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला, शिवरायांची लढाई कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हती’, आदी ‘फेक नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) पसरवण्याचे षड्यंत्र या मंडळींचे चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून हिंदूंना प्रेरणा मिळते. ती नष्ट करून हिंदूंना तेजोहीन करण्यासाठी ही मंडळी टपलेली आहेत. शिवाजी विद्यापिठाच्या नामविस्ताराला विरोध करणारी सर्व मंडळी ही याच विचारांची असतील, असे नाही. यांतील अनेकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली आदराची भावना प्रामाणिकपणाची असेलही; परंतु ही भावना नवीन नावाने अधिक वृद्धींगत होईल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
पुरोगाम्यांचा प्रतिगामीपणा !
वर्ष १९६२ मध्ये विद्यापिठाच्या स्थापनेचा प्रस्ताव आला, त्या वेळी प्राचार्य एस्.आर्. तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ‘विद्यापिठाचे नाव संक्षिप्त असावे’, म्हणून ‘शिवाजी विद्यापीठ’, असे नाव ठेवण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या नावाला सहमती दर्शवली. ‘या महनीय व्यक्तींनी सहमती दर्शवली असतांना त्याचे नामांतर कशासाठी ?’, असे एक पालुपद विद्यापिठाच्या कार्यकारिणीने पुढे केले आहे. दुसरे म्हणजे ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’चा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ केल्यामुळे संपूर्ण उल्लेख करायला लोक टाळाटाळ करतात आणि ‘सी.एस्.एम्.टी.’ किंवा ‘सी.एस्.टी.’ असा उल्लेख करतात. त्यामुळे विद्यापिठाचे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ केल्यास या नावाचाही संक्षिप्त उल्लेख होईल आणि सध्या होत असलेला ‘शिवाजी विद्यापीठ’ हा उल्लेखही बंद होईल’, असेही पालुपद या मंडळींनी पुढे केले आहे. एकीकडे पुरोगामी म्हणवून परंपरांना फाटा द्यायचा, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज या आदरार्थी उल्लेखाच्या विरोधासाठी लुटूपुटू कारणे पुढे करायची. वाह रे, पुरोगाम्यांचा वैचारिकवाद ! पुरोगाम्यांचा हा प्रतिगामीपणा अनाकलनीय आहे. खरेतर तत्कालीन काळात ‘छत्रपती’ या शब्दातूनच शिवरायांचा पर्यायाने मराठ्यांचा प्रभाव दिसून येत होता, तसेच ‘छत्रपती’ या पदाला तत्कालीन ५ पातशाह्याही घाबरून होत्या. तोच प्रकार आता होत आहे, असे म्हटल्यास वावगे ते काय ? विद्यापिठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा केला आणि नावाचा संक्षिप्त उल्लेख झाला, तर अशी भीती या मंडळींना वाटत असेल, तर त्यांनी प्रथम स्वत:पासून विद्यापिठाचा पूर्ण उल्लेख होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत. भारतात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ’, ‘सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठ’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ या नावांची विद्यापिठे त्यांच्या संपूर्ण उल्लेखाने म्हटली जातात. शिवाजी विद्यापिठाची कार्यकारिणी मात्र विनाकारण राईचा पर्वत करत आहे आणि ठोकशाहीची भाषा करून ते कोणते अभिव्यक्तीस्वातंत्र्य व्यक्त करत आहेत ? ठोकशाहीची भाषा ही साम्यवादी आणि पुरोगामी यांच्या समानतेच्या कोणत्या तत्त्वात बसते ?, तेही त्यांनी सांगावे. अशी भाषा वापरून या लोकांनी त्यांचा राज्यघटनेवर, सरकारवर आिण जनसामान्यांवर विश्वास नसल्याचेच दाखवून दिले आहे. शिवाजी विद्यापिठाच्या कार्यकारिणीमध्ये भाजप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचेही पदाधिकारी आहेत. पुरोगामी विचारांची मंडळी विद्यापिठाच्या नामांतराचा विषय प्रतिष्ठेचा करत असतील, तर हिंदुत्वाच्या विचारांच्या मंडळींनीही ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ या नामविस्तारासाठीची भूमिका रोखठोक आणि निर्भिडपणे मांडण्याचे धारिष्ट्य दाखवायला हवे. खरेतर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ या नामविस्तारासाठी मोर्चा काढावा लागणे, हे सरकारसाठी भूषणावह नाही. आताच्या सरकारच्या काळात जर महाराष्ट्राच्या राजांचा उल्लेख आदराने करण्यासाठी एखादे विद्यापीठ आडमुठेपणा करत असेल, तर सरकारने अधिकाराचा वापर करून त्यांना वठणीवर आणावे. अन्यथा भविष्यकाळात ही साम्यवादी मंडळी सरकारला वरचढ होतील, हे त्यांनी लक्षात घ्यावे !
‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतराला पुरो(अधो)गाम्यांचा विरोध हा केवळ हिंदुद्वेषापोटीच ! |