
‘नावात काय आहे ?’ असा प्रश्न सध्या चालू असलेल्या एका वादग्रस्त नव्हे, तर मुद्दाम उकरून काढलेल्या प्रसंगावरून चर्चिला जात आहे. होय, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्याविषयीची मोर्चाची सिद्धता आणि त्याला होणारा विरोध यामुळेच हा प्रश्न विचारला जात आहे.

ही तर खरे म्हणजे शिवछत्रपतींना मान देण्यासाठी, आदर देण्यासाठीची चळवळ आहे. जेव्हा एखादी व्यक्ती नकळतपणे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ याऐवजी ‘शिवाजी महाराज’ असे उच्चारण करते, तेव्हा तिला ‘हा छत्रपतींचा अवमान आहे’ असे म्हणणारेच आज ‘शिवाजी विद्यापिठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतर करायला विरोध करत आहेत. मग याला ‘विरोधासाठी विरोध’ म्हणायचे का ? कारण आपण तर छत्रपतींना योग्य मान देत आहोत. त्यामुळे येणार्या पिढ्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आणि अभिमान निर्माण होणार आहे. यामुळे केवळ शिवछत्रपतींच्या शौर्याचे स्मरणच नाही, तर संपूर्ण विचारप्रक्रिया पालटणार आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमधील हा मैलाचा दगड आहे आणि म्हणूनच पुरोगामी अन् सर्वधर्मसमभाव मानणारे याला विरोध करत आहेत. अशा विचारधारेमुळेच ‘भारत तेरे टुकडे होंगे’सारखे देशविरोधी गट सिद्ध होत आहेत. नामांतराला विरोध करणारे म्हणतात की, बाहेरील कुणीतरी येऊन नामांतराची मागणी करत आहेत; परंतु अशी मागणी बाहेरून येणार्यांना का करावी लागते ? खरेतर त्यांच्याच मनामध्ये ‘शिवाजी विद्यापिठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ व्हावे’, हा विचार यायला हवा; परंतु पुरोगामित्वाचे पांघरूण पांघरलेल्यांना हे कोण समजावणार ?
खरे पहायला गेले, तर आज अनेक शहरांची, परिसरांची जी मोगल नावे होती, ती पालटण्यास आरंभ झाला आहे आणि नावात पालट केल्यामुळे ते उच्चारत असतांनासुद्धा चांगले वाटत आहे; उदा. ‘औरंगाबाद’चे नुकतेच ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्यात आले. ‘छत्रपती संभाजीनगर’ असे जेव्हा जेव्हा आपण उच्चारणार तेव्हा, तेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, त्यांनी केलेला स्वराज्यासाठीचा त्याग यांचे स्मरण कळत-नकळत होत रहाणार आणि पर्यायाने आपल्या मनात राष्ट्राप्रती अभिमान आणि पुढे जाऊन प्रसंगी त्याग करण्याचा भाव निर्माण होणार. त्यामुळेच ‘नावात काय आहे ?’ म्हणणार्यांना सांगावेसे वाटते की, ‘छत्रपती’ लावल्याने त्यात शौर्य, अभिमान, त्यागभावना निर्माण करण्याची शक्ती, आदर, नम्रता सर्व काही येणार आहे…आणि म्हणूनच आमच्या पुढील पिढ्यांमध्ये हे सर्व रुजवण्यासाठी आम्हाला ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ हे नाव हवे आहे !
– श्री. वैभव आफळे, गोवा.