कोंढवा (पुणे) येथील अनधिकृत दूरभाष केंद्राच्या प्रकरणी ए.टी.एस्.कडून ३ जणांना अटक !

८ वर्षे चालू होते अनधिकृत दूरभाष केंद्र !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – कोंढवा येथील अनधिकृत दूरभाष केंद्र प्रकरणी (टेलिफोन एक्स्चेंज प्रकरणी) राज्य आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.ने) नौशाद सिद्धीकी उपाख्य कुमार, महंमद अन्सारी उपाख्य सोनू आणि पियूष गजभिये या ३ जणांना अटक केली आहे. हे तिघे गेली ८ वर्षे हे दूरभाष केंद्र चालवत होते, अशी माहिती अन्वेषणातून समोर येत आहे.  (एवढी वर्षे अनधिकृत दूरभाष केंद्र चालू असूनही पोलिसांना त्याचा काहीच सुगावा कसा लागला नाही ? ही पोलिसांची कार्यक्षमता आहे का ? – संपादक)  चीन, पाकिस्तान आणि आखाती देशांतून येणारे दूरभाष स्थानिक क्रमांकांवर पाठवण्यात येत होते. याविषयची माहिती ए.टी.एस्.ला मिळाल्यानंतर धाड टाकण्यात आली. या कारवाईत ३ सहस्र ७८८ सीमकार्ड, ७ सीम खोके (बॉक्स), ९ वायफाय राऊटर्स, अँटेना आणि भ्रमणसंगणक आदी साहित्य जप्त करण्यात आले होते.

नौशाद आणि महंमद हे ८ वी उत्तीर्ण आहेत. पियूष हा संगणक अभियंता आहे. उत्तर प्रदेशचा नौशाद याने कोंढवा येथे भाडेतत्त्वावर घर घेतले होते. हे आरोपी मित्र असून यापूर्वी भिवंडी येथे रहायचे. नौशाद याला भाड्याने घर देणार्‍या घरमालकांवर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल ए.टी.एस्.कडून कोंढवा पोलिसांना देण्यात आला आहे.