अल्पसंख्यांकांना त्रास देणार्‍या कुणालाही सोडणार नाही ! – Bangladesh Interim Government

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे आश्‍वासन !

‘इस्कॉन’च्या शिष्टमंडळाने अंतरिम सरकारमधील गृह सल्लागार असलेले निवृत्त ब्रिगेडियर जनरल एम्. सखावत हुसेन यांची भेट घेतली.

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवरील आक्रमणे  करणार्‍यांवर किंवा त्यांचा छळ करणार्‍यांवर जलद आणि कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन येथील अंतरिम सरकारकडून देण्यात आले आहे.

१. ‘इस्कॉन’च्या शिष्टमंडळाने अंतरिम सरकारमधील गृह सल्लागार असलेले निवृत्त ब्रिगेडियर जनरल एम्. सखावत हुसेन यांची नुकतीच भेट घेतली. त्या वेळी हुसेन म्हणाले की, बांगलादेशात सामाजिक सौहार्द आहे. येथे सर्व धर्माचे लोक मतभेदाविना रहातात. अल्पसंख्यांकांना त्रास देणार्‍या कुणालाही आम्ही सोडणार नाही.

२. या भेटीमध्ये ‘इस्कॉन बांगलादेश’चे अध्यक्ष सत्यरंजन बरोई यांनी अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाची मागणी करत त्याविषयीचे ८ प्रस्ताव मांडलेे. यामध्ये देखरेख शाखा स्थापन करण्यापासून ते अल्पसंख्यांक आयोग स्थापन करण्यापर्यंतच्या मागण्या करण्यात आल्या. यासह मंदिरांना स्वतंत्र सुरक्षा पुरवण्यासही सांगण्यात आले. यावर हुसेन यांनी सर्व प्रस्तावांवर पाठिंबा देण्याचे आश्‍वासन दिले.

संपादकीय भूमिका

  • दोषींवर केवळ कारवाई करून चालणार नाही, तर पीडित हिंदूंना हानीभरपाईही देणे आवश्यक आहे !
  • हे अंतरिम सरकार जोपर्यंत दोषींवर कारवाई करत नाही, तोपर्यंत हिंदु संघटनांनी याचा पाठपुरावा करत सरकारवर दबाव कायम ठेवला पाहिजे !