Golden Age Of America Begins : अमेरिकेच्या सुवर्णयुगाला प्रारंभ ! – डॉनल्ड ट्रम्प

  • राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधीनंतर डॉनल्ड ट्रम्प यांचे विधान !

  • अमेरिकेशी शत्रूत्व घेणार्‍यांना धडा शिकवण्याची केली घोषणा

राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिले भाषण केले. ते म्हणाले की, २० जानेवारी हा दिवस म्हणजे अमेरिकेसाठी स्वातंत्र्य दिवस आहे, असेच मला वाटते. अमेरिकेत या क्षणापासून सुवर्णयुगाला प्रारंभ झाला आहे. आता जगातला कुठलाही देश हा आपला वापर करू शकणार नाही. आता आपण आपल्या एकतेसाठी आणि अमेरिकेला महान बनवण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या देशात कुठलीही घुसखोरी आता मान्य असणार नाही. आपल्या देशाशी शत्रुत्व घेतले, तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ आणि धडा शिकवू.

डॉनल्ड ट्रम्प यांनी मांडलेली सूत्रे

१. माझ्यावर प्रचाराच्या वेळी आक्रमण झाले होते; मात्र मी वाचलो; कारण मला अमेरिकेला खूप पुढे न्यायचे आहे.

२. मला लोकांनी निवडून दिले. हे यश ज्या ईश्‍वराने दिले, त्यालाही कधीही विसरणार नाही. अमेरिका कधीही अपयशी होणार नाही, हे लक्षात ठेवा, सगळ्यांनी एक व्हा, आपल्याला एकत्र येऊन अमेरिकेला आणखी समृद्ध करायचे आहे.

अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा

डॉनल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणातच अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली. तसेच दक्षिण सीमेवर जी घुसखोरी होत आहे, ती रोखण्यासाठी सैन्याला पाठवले जाईल, अशी घोषणाही केली.

कॅनडा आणि मेक्सिको यांच्यावर लादला कर

अमेरिका १ फेब्रुवारीपासून मेक्सिको आणि कॅनडा येथून आयात होणार्‍या वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त कर लादणार, अशी घोषणा ट्रम्प सरकारकडून करण्यात आली आहे.

तृतीयपंथियांना स्वतंत्र दर्जा नाही

राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथ विधीनंतर डॉनल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आजपासून अमेरिकेत केवळ स्त्री आणि पुरुष या दोनच गटांना मान्यता असेल. अमेरिकन सरकारची ही अधिकृत भूमिका असेल. या आदेशामुळे तृतीयपंथियांना स्वतंत्र वागणूक दिली जाणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.