Prayagraj Kumbh Parva 2025 : बांगलादेश आणि काश्मिरी हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – स्वामी कंजलोचन कृष्णदास, इस्कॉन, श्री चंद्रोदय मंदिर, वृंदावन

प्रयागराज कुंभपर्व २०२५

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाकुंभमेळ्यात काश्मीर आणि बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या अत्याचारासंबंधीचे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन !

दीपप्रज्वलन करतांना स्वामी कंजलोचन कृष्णदास (मध्यभागी), छायाचित्रात डावीकडून सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (उजवीकडे)

प्रयागराज, २१ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभमेळ्यासाठी ४० कोटींहून अधिक भाविक स्नानासाठी एकत्र येणार आहेत; मात्र आज बांगलादेश आणि काश्मिरी हिंदूंवर कसे अन्याय अत्याचार होत आहेत, हे विसरता कामा नये. आज बांगलादेशात आपली मंदिरे, मूर्ती तोडल्या जात आहेत. ही समस्या सोडवायची असेल, तर बांगलादेश, भारत आणि विदेशांतील सर्व हिंदूंनी एकत्र आले पाहिजे, तरच यावर उपाय काढता येऊ शकतो. यासाठी हिंदु जनजागृती समितीने लावलेले काश्मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचारांसंबंधीचे प्रदर्शन भाविकांनी अवश्य पहावे, असे आवाहन ‘इस्कॉन’चे वृंदावन धाम येथील श्री चंद्रोदय मंदिराचे स्वामी कंजलोचन कृष्णदास यांनी केले.

ते महाकुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सेक्टर ६, कैलाशपुरी भारद्वाज मार्ग येथे काश्मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंवर कट्टरतावादी आणि आतंकवादी यांनी केलेल्या भीषण अत्याचारासंबंधीच्या चित्र तथा ग्रंथ प्रदर्शन यांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन स्वामी कंजलोचन कृष्णदास, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी इस्कॉनचे स्वामी राधामोहन दास, समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी उपस्थित होते.

स्वामी कंजलोचन कृष्णदास

स्वामी कंजलोचन कृष्णदास पुढे म्हणाले, ‘‘काश्मीर आणि बांगलादेश येथे हिंदूंवर काय अन्याय होत आहे ? इतर राज्यांत हिंदूंची काय स्थिती आहे ? याची महत्त्वपूर्ण माहिती या प्रदर्शनातील फलकांवरून देण्यात आली आहे, तसेच सनातन धर्म काय आहे ? याची सर्व माहिती या प्रदर्शनातून सहजपणे घेता येईल.’’

‘१९ जानेवारी १९९० या दिवशी आतंकवादामुळे काश्मिरी हिंदूंना तेथून विस्थापित व्हावे लागले. त्याला ३५ वर्षे झाली; मात्र सरकार, न्यायालय, संसद असूनसुद्धा विस्थापित हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन न होणे, हा लोकशाहीचा पराभव आहे. या प्रदर्शनात काश्मीर आणि बांगलादेश येथे झालेला हिंदूंचा नरसंहार, साधूसंतांच्या हत्येचे षड्यंत्र, लव्ह जिहाद, धर्मांतराची समस्या आणि उपाय, गोरक्षा, मंदिर-संरक्षण, दंगलीच्या वेळी हिंदूंचे संरक्षण, देवतांचा सन्मान, असे धर्मरक्षा कक्ष, तसेच राष्ट्र जागृती कक्षात जिहादी आतंकवाद, राष्ट्रद्रोही हलाल जिहाद, राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान, स्वदेशी अस्मितांचे संवर्धन, सुराज्य अभियान फलक प्रदर्शन असणार आहे. यासह हिंदु राष्ट्रासंबंधी आक्षेप आणि त्याचे खंडण, संत तथा धर्मप्रचारकांचे मार्गदर्शन आणि हिंदूंना धर्माचरण करण्यास प्रेरित रहाणारे कक्ष प्रदर्शनात असतील’, असे समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी बांगलादेश, भारत आणि विदेशांतील सर्व हिंदूंनी एकत्र आले पाहिजे !