सिनेमागृहात घुसून घोषणाबाजी !
लंडन – भाजपच्या खासदार तथा अभिनेत्री कंगना रणावत यांचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना अतिशय आवडला आहे. कंगना राणावत यांच्या अभिनयाचे, लेखनाचे आणि दिग्दर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे, तर दुसरीकडे खलिस्तानवादी या चित्रपटाला विरोध करत आहेत. ब्रिटनमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी खलिस्तानी समर्थकांनी निदर्शने केली. खलिस्तान समर्थकांच्या एका गटाने लंडनमध्ये सिनेमागृहात घुसून घोषणाबाजी केली. या चित्रपटाद्वारे शिखांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि इतिहासाचे चुकीचे वर्णन करण्याचा आरोप करण्यात येत आहे. पंजाबमध्येही या चित्रपटाविरुद्ध निदर्शने झाली आहेत. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधम समितीने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
१. लंडनमधील एका सिनेमागृहात ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन चालू असतांना अचानक खलिस्तानवादी आत घुसले आणि चित्रपट थांबवण्याची मागणी करत घोषणाबाजी चालू केली. या खलिस्तानवाद्यांनी सिनेमागृहात ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या आणि भारताविरुद्ध अपशब्दही वापरले.
२. आंदोलकांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केल्याने सिनेमागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण केले. सिनेमागृहात उपस्थित प्रेक्षकांनी खलिस्तानवाद्यांना विरोध केल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला.
ब्रिटीश पोलिसांकडून कारवाई नाहीखलिस्तानवाद्यांनी घातलेल्या गोंधळानंतरही ब्रिटीश पोलिसांनी त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. (याआधीही खलिस्तानवाद्यांनी तेथील भारतीय दूतावासावर आक्रमण केले होते आणि तेथील पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. यातून ब्रिटीश पोलीस खलिस्तानी समर्थक आहेत, असे समजायचे का ? – संपादक) त्यामुळे ब्रिटीश सरकार आणि प्रशासन यांच्या भूमिकेविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. |
संपादकीय भूमिकाब्रिटन हे खलिस्तानवाद्यांचे आश्रयस्थान बनले आहे. असले प्रकार थांबवण्यासाठी आता भारत सरकारनेच ब्रिटनवर दबाव आणणे आवश्यक ! |