अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची घोषणा !

वॉशिंग्टन (अमेरिका) – मी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवणार आहे. मला मध्य-पूर्वेतील अराजकता रोखायची आहे. मी जगात तिसरे महायुद्ध होऊ देणार नाही. आपल्याला कल्पना नाही की, आपण त्याच्या किती जवळ आहोत, अशा घोषणा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी शपथविधी घेण्यापूर्वी एका सभेमध्ये केल्या. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (अमेरिकेला पुन्हा महान बनवा) असे या सभेचे नाव होते. ट्रम्प यांनी २० जानेवारीला रात्री भारतीय वेळेनुसार साडेदहा वाजता राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.
ट्रम्प पुढे म्हणाले की, मी देशाचा कार्यभार संभाळण्याआधी, तुम्ही अशा गोष्टी बघत आहात, ज्याची कुणाला अपेक्षा नव्हती. प्रत्येक जण याला ‘ट्रम्प इफेक्ट’ (ट्रम्प यांचा प्रभाव) म्हणत आहेत; पण हा तुमचा ‘इफेक्ट’ आहे.
डॉनल्ड ट्रम्प यांनी मांडलेली सूत्रे
१. अमेरिकेत बेकायदेशीररित्या रहाणार्यांना बाहेर काढणार. घुसखोरी होऊ नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त असेल. ही मोठी मोहीम असेल. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होणार असून यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो.
२. आम्हाला चीनला आपला व्यवसाय द्यायचा नाही. आम्हाला भरपूर सार्या नोकर्या वाचवायच्या आहेत.
३. अमेरिकेला पुन्हा महान राष्ट्र बनवणार. अमेरिकेची शक्ती वाढवणार, गौरव प्राप्त करून देणार.
४. इस्रायल-हमास युद्धविराम हा अमेरिकेचा ऐतिहासिक विजय आहे. आमच्यामुळे युद्धविरामाचा करार झाला.
५. अमेरिकेत पुन्हा ‘टिकटॉक’ अॅप चालू झाले आहे. अमेरिकेची टिकटॉकमध्ये ५० टक्के मालकी असेल, या अटीवर ‘टिकटॉक’ चालू करायला अनुमती दिली आहे.
६. आम्ही शाळेत देशभक्ती वाढवणार आहोत. आपले सैन्य आणि सरकार यांमधून कट्टरतावादी आणि साम्यवादी आदींना बाहेर काढणार आहोत.
७. मी पदभार स्वीकारल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ्. केनेडी, माजी अॅटर्नी जनरल रॉबर्ट एफ् केनेडी आणि मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या हत्येशी संबंधित सर्व कागदपत्रे प्रसारित केली जातील.