जोधपूर (राजस्थान) – महर्षींच्या आज्ञेनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ओशिया, जोधपूर (राजस्थान) येथील मां सत्चियादेवीचे (श्री सत्चियादेवी मंदिर) ४ ऑगस्ट २०२४ या दिवशी, म्हणजेच दीप अमावास्येच्या दिवशी भावपूर्ण दर्शन घेतले. या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी देवीची खणा-नारळाने ओटी भरून दर्शन घेतले. या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘सर्वत्रच्या साधकांना होत असलेले विविध त्रास दूर व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यासाठी भावपूर्ण प्रार्थना केली. या वेळी सनातनच्या जोधपूर येथील पू. (श्रीमती) सुशीला मोदी याही उपस्थित होत्या. याप्रसंगी जोधपूर येथील साधक सर्वश्री शीतल मोदी आणि शैलेश मोदी यांचा परिवार, तसेच जयपूर येथील साधक श्री. ऋषि राठी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
ओशिया येथील ‘श्रीसत्चिया’देवीचा इतिहास‘राजस्थान राज्यातील जोधपूर शहरापासून ६० कि.मी. दूर ‘ओशिया’ नावाचे गाव आहे. प्राचीन काळात या गावाचे नाव ‘उपकेशनगरी’ होते. या ठिकाणी पूर्वी अनेक मंदिरे होती. त्यातील प्रमुख मंदिर ‘श्री सत्चियादेवी मंदिर’ होते. पुढे ‘सत्चित’चा अपभ्रंश ‘सत्चिया’ असा झाला आणि ‘उपकेशनगरी’चा अपभ्रंश ‘ओशिया’ असा झाला. १२ व्या शतकापासून ही देवी राजस्थानमधील अनेक क्षत्रिय लोकांची आणि जैनमधील ‘ओस्वाल’ लोकांची कुलदेवी म्हणून ओळखण्यात येऊ लागली. ‘सत्चियादेवी’ ही आदिशक्ति जगदंबेचे रूप आहे. वर्ष १२७ मध्ये, म्हणजे दुसर्या शतकात राजा उप्पलदेवने येथे मंदिराची निर्मिती केली. देवीने एका देवीभक्त नववधूला या ठिकाणी साक्षात् दर्शन दिले होते. त्या वेळी भूकंप झाला. भूमी दुभंगली आणि देवीची मूर्ती बाहेर आली. पुढे गावकर्यांकडे मंदिर बांधायला धन नव्हते. श्रीसत्चिया देवीने राजा उप्पलदेवच्या स्वप्नात जाऊन एका दैवी खजिन्याचे रहस्य सांगितले आणि त्या धनाचा उपयोग करून मंदिर बांधण्यास सांगितले. हे स्थान २००० वर्षे प्राचीन आहे आणि ही देवी साक्षात् आदिशक्तीचा अवतार आहे.’ |
क्षणचित्र : देवीच्या दर्शनाला जात असतांना पावसाचे काहीही वातावरण नव्हते. ‘मंदिर १४ कि.मी. अंतरावर आहे’, असा फलक वाटेमध्ये दिसला. त्याच वेळी अचानक थोडासा पाऊस आशीर्वादरूपी पडला. त्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘आपल्याला वरुणदेवाचा आशीर्वाद मिळाला.’’