अमेरिकेने दिला नागरिकांना सल्ला
वॉशिंग्टन – अमेरिकेने त्याच्या नागरिकांना मणीपूर आणि जम्मू-काश्मीर या राज्यांत प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेच्या नागरिकांनी आतंकवादी आणि नक्षलवादी सक्रीय असलेला भारत-पाकिस्तान सीमावर्ती भाग आणि भारताचा पूर्वेकडील भाग येथे जाऊ नये, असा अमेरिकेने भारतात प्रवास करणार्या त्याच्या नागरिकांना सल्ला दिला आहे. भारतासाठी सुधारित प्रवास सल्लागारात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, गुन्हेगारी, आतंकवाद आणि नक्षलवाद यांमुळे भारतात प्रवास करतांना अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.
१. आतंकवाद आणि हिंसाचार यांमुळे अमेरिक नागरिकांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रवास करतांना निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी शिफारस या मार्गदर्शक पत्रात केली आहे.
२. ‘बलात्कार हा भारतातील सर्वांत वेगाने वाढणार्या गुन्ह्यांपैकी एक आहे. (तसे पाहिल्यास अमेरिकेत ६ ते १० वर्षांच्या वयोगटातील मुले बंदुका घेऊन अंदाधुंद गोळीबार करतात. त्यामुळे तेथील नागरिक सुरक्षित नाहीत. हे लक्षात घेता अमेरिका भारतापेक्षा धोकादायक म्हणावी लागेल ! – संपादक) पर्यटनस्थळे आणि इतर ठिकाणी लैंगिक अत्याचारासारखे हिंसक गुन्हे घडले आहेत. आतंकवादी कधीही आक्रमण करू शकतात. ते पर्यटनस्थळे, वाहतूक केंद्रे, बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स आणि सरकारी आस्थापने यांना लक्ष्य करतात’, असेही अमेरिकेने त्याच्या सूचनापत्रात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाभारतात फोफावणारा आतंकवाद आणि नक्षलवाद यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेली ही अपकीर्ती पुसून टाकण्यासाठी भारत सरकार काय प्रयत्न करणार ? |