राममंदिराच्या पुजार्‍यांचा पेहरावाचा रंग आता पिवळा; मोबाईलवरही बंदी !

अयोध्या – अयोध्येतील राममंदिराच्या व्यवस्थेत पालट करण्यात आला आहे.  मंदिराच्या पुजार्‍यांचा पेहराव पालटला आहे. पुरोहितांचा पेहरावाच्या कपड्यांचा रंग आता भगव्यावरून पिवळा करण्यात आला आहे. याखेरीज त्यांना मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
राममंदिर विश्‍वस्त मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलल्लाच्या  मंदिरातील गर्भगृहातील पुजारी आतापर्यंत भगव्या कपड्यात दिसत होते. ते भगवा फेटा, भगवा कुर्ता आणि पितांबर परिधान करत असे; पण आता पुजारी पिवळा कुर्ता, पिवळ्या रंगाची पगडी आणि पिवळे पितांबर परिधान करू लागले आहेत. हा नियम १ जुलैपासून लागू करण्यात आला आहे. पुरोहितांना पिवळे फेटे बांधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

राममंदिरात पुजार्‍यांच्या पथकात एका मुख्य पुजार्‍यासह चार साहाय्यक पुजारी आहेत आणि प्रत्येक साहाय्यक पुजार्‍यासमवेत पाच प्रशिक्षणार्थी पुजारी आहेत. या पुजार्‍यांचे प्रत्येक पथक पहाटे ३.३० ते रात्री ११ या वेळेत पाच तासांच्या पाळीमध्ये सेवा करते.