महाराणा प्रताप सेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !

पुतळ्याचे दहन करतांना महाराणा प्रताप सेनेचे कार्यकर्ते

आझमगड (उत्तर प्रदेश), ३ जुलै (वार्ता.) – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदु समाजावर अशोभनीय टिपणी केल्याने संतप्त झालेल्या महाराणा प्रताप सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी ‘राहुल गांधी यांनी समस्त हिंदु समाजाची माफी मागावी आणि त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र द्यावे’, अशी मागणी करण्यात आली.

हिंदू हिंसक नसून राष्ट्र आणि धर्म यांचा रक्षक आहे  ! – अनिल सिंह, उत्तरप्रदेश प्रभारी, महाराणा प्रताप सेना

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ९९ जागा मिळाल्या आणि एकाही हिंदु आचार्याने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली नाही. हिंदु हा हिंसक नसून धर्म आणि राष्ट्र यांचा रक्षक असतो. भगवान शिव, श्रीराम आणि श्यामसुंदर यांनी राक्षसांचा वध केला होता. रावणाने सीतेचे अपहरण केल्यावर हिंदू लढतात. मंदिराच्या रक्षणासाठी हिंदू हिंसक होतो. त्यांना हिंसक म्हणणे म्हणजे जैन, शीख आणि बौद्ध यांनाही हिंसक म्हणण्यासारखे आहे. देशातील हिंदूंनी तुम्हाला मतदान केले असेल, याचा अर्थ ते हिंसक आहेत का ?

हिंदु  समाजाचा अपमान वारंवार होतो ! – बिजेंद्र सिंह, महाराणा प्रताप सेना प्रमुख, उत्तर प्रदेश

राहुल गांधी यांनी संपूर्ण हिंदु समाजाला हिंसक आणि असत्य म्हणत संपूर्ण हिंदु  समाजाचा अपमान केला आहे आणि असे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. वर्ष २०१० मध्ये तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी हिंदूंना ‘आतंकवादी’ म्हटले होते.