Amritpal Case : अमेरिकेतील खलिस्‍तानप्रेमी अधिवक्‍त्‍याने घेतली तेथील उपराष्‍ट्रपतींची भेट !  

खलिस्‍तान समर्थक अमृतपाल सिंह याच्‍या शपथविधीच्‍या सूत्रावर केली चर्चा

अमेरिकेतील शीख अधिवक्‍ता जसप्रीत सिंह यांनी अमेरिकेच्‍या उपराष्‍ट्राध्‍यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली

वॉशिंग्‍टन – लोकसभा निवडणुकीत पंजाबच्‍या खडूर साहिब मतदारसंघातून खलिस्‍तान समर्थक अमृतपाल सिंह याचा विजय झाला आहे. तो सध्‍या राष्‍ट्रीय सुरक्षा कायाद्याच्‍या (एन्.एस्.ए.च्‍या) अंतर्गत आसाममधील कारागृहात अटकेत आहे. त्‍याला संसद सदस्‍याच्‍या शपथविधीसाठी संसदेत उपस्‍थित रहाता आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील शीख अधिवक्‍ता जसप्रीत सिंह यांनी अमेरिकेच्‍या उपराष्‍ट्राध्‍यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. या भेटीत त्‍यांनी खलिस्‍तान समर्थक अमृतपाल सिंहच्‍या शपथविधीचा आणि अटकेचा मुद्दा उस्‍थित केल्‍याचे वृत्त आहे. या भेटत खूप चांगला प्रतिसाद मिळाल्‍याचे अधिवक्‍ता जसप्रीत सिंह यांनी सांगितले. यावर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.

१. ही बैठक कॅलिफोर्निया राज्‍यातील लॉस एंजेलिस शहरात झाली. या बैठकीत अमृतपाल सिंह याच्‍यासह शिखांशी संबंधित मुद्दे मांडण्‍यात आले. अमृतपाल सिंह याच्‍यावर  चुकीच्‍या पद्धतीने ‘एन्.एस्.ए.’ लादण्‍यात आला आहे. हे पूर्णपणे अवैध आहे, असे जसप्रीत सिंह या वेळी म्‍हणाले.

२. अमृतपाल सिंह याला पंजाब पोलिसांनी २३ एप्रिल २०२३ या दिवशी अटक केली होती. तेव्‍हापासून तो आसाममधील दिब्रुगड कारागृहात बंद आहे. खलिस्‍तानी विचारसरणीला पाठिंबा दिल्‍याने त्‍याच्‍या विरोदात राष्‍ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका

खलिस्‍तान समर्थक अमृतपाल सिंहचा शपथविधी आणि अटक हे सूत्र भारताच्‍या न्‍यायव्‍यवस्‍थेच्‍या अंतर्गत येतो. असे असतांनाही अमेरिकेतील खलिस्‍तानप्रेमी अधिवक्‍ता तेथील उपराष्‍ट्रपतींची भेट घेऊन या सूत्रावर चर्चा करतो. भारताच्‍या अंतर्गत सूत्रामध्‍ये अमेरिका नाक खुपसत आहे, हेच यातून दिसून येते ! याविषयी भारताने अमेरिकेला खडसावणे आवश्‍यक !