मी पुण्याचा खासदार झाल्यानंतर टिपू सुलतानचे स्मारक उभारणार ! – अनिस सुंडके, एम्.आय.एम्.

‘एम्.आय.एम्.’चे उमेदवार अनिस सुंडके यांचे वादग्रस्त विधान !

अनिस सुंडके

पुणे – ‘मी पुण्याचा खासदार झाल्यावर टिपू सुलतानचे कार्य लक्षात घेऊन त्यांचे भव्य स्मारक उभारणार आहे’ अशी घोेषणा पुणे लोकसभा मतदारसंघातील ‘एम्.आय.एम्.’चे उमेदवार अनिस सुंडके यांनी केली. सुंडके पुढे म्हणाले, ‘‘पुणे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, बेरोजगारी यांसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मी पुणे शहराचा खासदार झाल्यानंतर पुणेकर नागरिकांना सर्व समस्यांमधून मुक्त करणार आहे. देशात विविध महान व्यक्तींची स्मारके आहेत. या स्मारकांच्या माध्यमातून नव्या पिढीला प्रत्येक स्मारक प्रेरणा देत आले आहे. त्यामुळे मी पुण्याचा खासदार झाल्यानंतर टिपू सुलतानचे कार्य लक्षात घेऊन भव्य स्मारक उभारणार.’’

टिपू सुलतानच्या स्मारकाला आमचा विरोधच ! – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप

धीरज घाटे

सुंडके यांचे टिपू सुलतानचे स्मारक बांधण्याविषयीचे विधान चुकीचे आहे. केवळ मुसलमानांच्या मतांचे ध्रुवीकरण करून समाजामध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे. राष्ट्रीय काँग्रेस आणि एम्.आय.एम्. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पुणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची नगरी आहे. टिपू सुलतान हा आक्रमक शासनकर्ता होता. त्याने या देशावर आक्रमण केल, सामान्य जनतेची हत्या केली, तसेच अनेक महिलांवर अत्याचार केले. अशा नतद्रष्ट आणि हिंदूवर अत्याचार करणार्‍या टिपू सुलतानचे उदात्तीकरण पुणेकर नागरिक आणि भाजप यांना मान्य नाही. टिपू सुलतानच्या स्मारकाला आमचा विरोधच आहे.

संपादकीय भूमिका 

  • असे विधान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात आणि तेही पुण्यात करण्याचे धाडस होणे हिंदूंना लज्जास्पद !
  • लाखो हिंदूंचे धर्मांतर करणारा, सहस्रो मंदिरांचा विध्वंस करणारा आणि असंख्य हिंदु महिलांची अब्रू लुटणारा क्रूरकर्मा टिपू सुलतानचे स्मारक महाराष्ट्रात उभारण्याची भाषा करणे संतापजनक ! पोलिसांनी वेळीच असल्या प्रवृत्तींना आळा घालावा. हिंदू आता तरी जागे होतील का ?
  • क्रूरकर्मा टिपू सुलतानचे स्मारक उभारणारे उद्या त्याच्यासारखे वागू लागल्यास आश्‍चर्य वाटू नये !